अमरावती :शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. पार्किंग व्यवस्था कुठेच नाही. त्यामुळे या दोन्ही दोन मुद्द्यांना हात घालत खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी महापालिकेत संबंधित ( MP Dr Anil Bonde ) प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दोन्ही प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र, आमदार प्रवीण पोटे ( MLA Pravin Pote ) यांनी वेगळीच भूमिका घेतल्याने महापालिका प्रशानस पेचात सापडली आहे.
महापालिकेने केलेली अतिक्रमण कारवाई :महापालिकेने खासदारांच्या आदेशानुसार कारवाई करायला सुरुवात केली. पहिला दिवशी गांधी चौक आणि परिसरातील अतिक्रमण हटवले. प्रशासनाने तातडीने पावले उचलत या ठिकाणा मोठ्या प्रमाणात कारवाई केली. दुसऱ्या दिवशी नगर वाचनालय, बापट चौकातील अतिक्रमण हटाविण्यासाठी महापालिका प्रशासन गेले असता, तेथील स्थानिक व्यापाऱ्यांनी या मोहिमेला विरोध केला. त्यांनी अनेक वर्षापासून येथे व्यवसाय करीत असल्याचे सांगत विरोध दर्शविला.
त्याच पक्षाच्या आमदारांनी व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ उडी घेतली : व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ त्याच पक्षाचे आमदार प्रवीण पोटे यांनी मैदानात उडी घेतल्याने प्रशासनापुढे पेचप्रसंग निर्माण झाला. व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात ठिय्या मांडला. त्यांच्या सोबत आमदारांनी येऊन महापालिकेच्या बुलडोझर समोर येऊन स्वतःचे वाहन आडवे लावले. त्यावेळी तुम्ही अतिक्रमण हटवूनच दाखवा, असे प्रतिआव्हानच अमरावती प्रशासनाला दिले. प्रशासकीय अधिकारी आणि आमदार साहेबांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे प्रशासनापुढे पेचप्रसंग निर्माण झाला.