अमरावती- कोरोनाचे भीषण संकट जगावर ओढवले आहे. वृद्धांवर कोरोनाचा झपाट्याने परिणाम होतो. अशा बातम्या आपण पाहिल्या असतील. येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रमाच्यावतीने या संकटकाळात आपल्या आई- वडिलांना घरी घेऊन जाण्याचे आवाहन मुलांना करण्यात आले. मात्र, आधीच परक्या करून टाकलेल्या आपल्या आई- वडिलांची आठवण एकाही मुलाला आली नाही. अखेर ज्या ठिकाणी ही वृद्ध मंडळी आयुष्याची अखेरची संध्याकाळ काढत आहे ते संत गाडगेबाबांचे वृद्धाश्रमच त्यांचे एकमेव आधार ठरले आहे.
संत गाडगेबाबा मिशन मुंबईच्यावतीने अमरावती जिल्ह्यात वालगावलगत पूर्णा नदीच्या काठावर संत गाडगेबाबा वृद्धाश्रम चालवण्यात येते. या वृद्धाश्रमात अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील विविध भागातील मुलांनी सोडून दिलेले एकूण 30 वृद्ध या वृद्धाश्रमात राहतात. डॉ. कैलास बोरसे हे पत्नी मंगला यांच्यासह मागील 35 वर्षांपासून या वृद्धाश्रमाची जबाबदारी सांभाळत आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात आपल्या जन्मदात्यांना घरी घेऊन जाण्याचे आवाहन वृद्धाश्रमच्यावतीने कैलास बोरसे यांनी वृद्धांच्या मुलांना केले होते. मात्र, या आवाहनाला एकाही वृद्धांच्या मुलाने प्रतिसाद दिला नाही. गंभीर बाब म्हणजे लॉकडाऊनच्या काळात पाच - सहा जणांनी आमच्या वृद्ध आई- वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचे आहे यासाठी संपर्क साधला, असे कैलास बोरसे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. आता वृद्धाश्रमाची क्षमता 30 वृद्धांपर्यंत आहे. असे असताना गत चार बर्षांपासून वृद्धाश्रमाल शासनाकडून एक पैसाही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे याठिकाणी जे वृद्ध आहेत त्यांना समाजातील काही दानदात्यांकडून मिळणारी मदत आणि उधार आणलेला किराणा, धान्य यावर सगळ्यांचे पोट पोसले जात असल्याचे बोरसे म्हणाले.