अमरावती - विदर्भातील एकमेम पंचतारांकित वीज प्रकल्प असणाऱ्या अमरावतीच्या नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या रतन इंडिया कंपनीत लॉकडाऊनमुळे उडालेल्या गोंधळात कामगारांचे वेतन कापले आहे. आता यात काय होऊ शकते का याबाबत विचार सुरू असून या संकटकाळात एकाही कर्मचाऱ्याला घरचा रस्ता न दाखवणारी आमची कंपनी आहे. आम्ही मजुरांच्या हिताच्या पाठिशी सदैव आहोत, असे कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अध्यक्ष लोकेश सिंह यांनी स्पष्ट केले.
रतन इंडिया कंपनी म्हणते, लॉकडाऊनच्या गोंधळामुळे कामगारांची वेतन कपात
या संकटकाळात एकाही कर्मचाऱ्याला घरचा रस्ता न दाखवणारी आमची कंपनी आहे. आम्ही मजुरांच्या हिताच्या पाठिशी सदैव आहोत, असे कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अध्यक्ष लोकेश सिंह यांनी स्पष्ट केले.
रतन इंडिया कंपनीत 500 कामगार आहेत. तर तीन ते चार कंत्राटदारांमार्फत एकूण 1600 मजूर काम करतात. वीज निर्मिती ही अतीमहत्वाची सेवा असल्याने कंपनीने लॉकडाऊनच्या काळात कंपनी बंद राहील असे कुठेही जाहीर केले नव्हते, असे कर्नल लोकेश सिंह 'ईटीव्ही भारता'शी बोलताना म्हणाले. लॉकडाऊन जाहीर होताच आम्ही कंत्राटदारांच्या सर्व 1600 कामगारांचे कर्फ्यु पास बनवलेत आणि सर्व कामगारांना हे पास दिले, असे असताना काही कामगार लॉकडाऊन असल्यामुळे कंपनीत सलग कामावर आलेच नाहीत. आता कामगार कामावर आले नाहीत, पंचिंग मशीनमध्ये त्यांची अनुपस्थिती दर्शवल्यामुळे नियमानुसार आशा काही कामगारांना एप्रिल महिन्याचे वेतन कमी मिळाले. यामुळे काही लोकांनी गोंधळ घातला. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रार गेली. आता संबंधित कामगारांचे कंत्राटदारांसोबत चर्चा करून काय तोडगा काढायचा याचा विचार सुरू आहे. कंत्राटदारांनी काही मजुरांना इतर वीज प्रकल्पात हलविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खरा रोष निर्माण झाला आहे.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता कामगारांनी त्यांना ज्या भागात कामासाठी पाठविण्यात येत आहे त्याठिकाणी काही दिवस काम करायला हरकत नाही. रतन इंडिया कंपनीने कोरोनाच्या या संकट काळात कोणालाही कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी हवी ती सर्व काळजी घेतली आहे. आमची कंपनी केवळ महाराष्ट्र राज्यात वीज विक्री करते. सध्या वीजेची मागणी फार कमी असल्याने कंपनी आर्थिक संकटात असली तरी कामगारांना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा कंपनीकडून दिल्या जात असल्याचे कर्नल लोकेश सिंह म्हणाले.