अमरावती -सफाई ठेक्याच्या विषयावरून अमरावती महापालिकेच्या आमसभेत ( Amravati Muncipal Corporation ) आज चांगलाच गदारोळ झाला. विशेष म्हणजे एमआयएमचे गटनेते अब्दुल नाझीम अब्दुल रौफ ( Amravati Cleaning Contract Dispute ) हे चेतन पवार यांच्या अंगावर चालून गेल्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सफाई कंत्राटाच्या विषयावरून वाद
अमरावती महापालिकेत सध्या चार सदस्यीय प्रभाग प्रणाली आहे. या प्रभाग प्रणाली नुसारच सफाईचा कंत्राट देण्यात आला आहे. आता येणारी निवडणूक तीन प्रभागीय सदस्य रचनेनुसार होणार असून सफाईचा कंत्राट बदलण्यात यावा, अशी भूमिका भाजपाच्या नगरसेवकांनी घेतली. दरम्यान, हा निर्णय निवडणुकीनंतर नवीन सदस्य आल्यावर आमसभेत घेता येईल. मात्र, आता हा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. तसेच ज्या कंत्राटदाराकडे सध्या सफाईचा कंत्राट आहे. त्या कंत्राटदाराने कोरोना काळात शहरात केलेल्या सफाईच्या कामाची सर्वांनीच कौतुक केले. आता या कंत्राटदाराचा करार रद्द करणे योग्य नाही, अशी भूमिका काँग्रेसचे विलास इंगोले माजी महापौर मिलिंद चिमोटे, शिवसेनेचे प्रशांत वानखडे यांनी घेतली. दरम्यान रिपाईचे गटनेता प्रकाश बनसोडे यांनी कंत्राटदाराला नियमानुसार दहा टक्के वाढ देता येईल का, याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना विचारले असता बसपाचे गटनेते चेतन पवार यांनी याबाबत आक्षेप घेतला.