अमरावती- चोरी करून पळत सुटलेला चोराला नागरिकांनी चोप दिल्याची घटना अमरावतीच्या देवरणकर परिसरात घडली आहे. पळणारा चोर रस्त्यात पडला आणि त्याने चोरलेले दागिने रस्त्यावर पसरल्याने चोरटा नागरिकांच्या हाती लागला. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
दागिन्यांची चोरी करून पळताना चोर पडला; नागरिकांनी बेशुद्ध होईपर्यंत चोपला - अमरावती चोर
अमरावतीमधील देवरणकर नगरात राहणाऱ्या वकील हरीश तापडिया यांच्या घरात चोर शिरला. दागिने व रोकड चोरी केल्यावर ते घेऊन पळत सुटलेला चोर रस्त्यावर पडल्याने त्याच्याकडील दागिने रस्त्यावर सर्वत्र पहुडले. चोरटा खाली पडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. यामुळे परिसरात खळबळ उडाली.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देवरणकर नगर परिसरात रात्री साडेदहा वाजता एक चोरटा वकील हरीश तापडिया यांच्या घरात शिरला. घरातील कपाट फोडून या चोरट्याने कपाटातील सर्व दागिने चोरले. दरम्यान, घर मालक हरीश तापडिया चोरट्या समोर येताच चोरट्याने धूम ठोकली. दागिने घेऊन पळणारा चोर रस्त्यावर पडल्यामुळे त्याच्या हातातील दागिने आणि रोख रक्कम रस्त्यावर पसरली. चोरटा खाली पडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. नागरिकांनी दिलेल्या मारामुळे चोरटा बेशुद्ध पडला.
घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस देवलांकर नगर परिसरात आले. पोलिसांनी बेशुद्धावस्थेत असणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे देवरणकर नगर परिसरात खळबळ उडाली.