अमरावती : गेल्या जानेवारी महिन्यात जिल्ह्यात आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी विनापरवानगी राजापेठ उड्डाणपुलावर शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्याच दरम्यान दर्यापूर येथेसुद्धा विनापरवानगी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वादंग निर्माण झाले होते. परंतु, आता नुकतेच मुख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) झालेले एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या कार्यकर्त्यांना पुतळा बसवण्याचे आश्वासन दिल्याने शिवाजी महाराजांचा पुतळा ( statue of Chhatrapati Shivaji Maharaj ) बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दर्यापूर येथे शिवरायांचा पुतळा बसवण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता दर्यापूरमध्ये लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला जाणार असून, राज्य सरकार त्याला निधीदेखील उपलब्ध करून देणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दर्यापूर या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी जानेवारी २०२२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विनापरवाना बसवल्याने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले होते.
रुग्णवाहिकासुद्धा देणार : यावेळी प्रशासनाने त्या ठिकाणचा पुतळा हटवला, पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर अमरावती जिल्ह्यातून पहिले शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट हे शेकडो शिवसैनिकांसह शिंदे गटात सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दर्यापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आता दर्यापूर येथे लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसणार, त्याचबरोबर एक रुग्णवाहिकासुद्धा देणार, जनहिताच्या कोणत्याही कामासाठी राज्य सरकार त्याला निधीसुद्धा उपलब्ध करून देईल, असेही मुख्यमंत्री म्हणाल्याचे गोपाल पाटील अरबट यांनी सांगितले.
गोपाल पाटील अरबट यांच्यासह कार्यकर्ते मुंबईला : शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्त्वात शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. त्यानंतर दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. यादरम्यान दर्यापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. यावर मुख्यमंत्र्यांनी दर्यापूर इथे तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बसवू, असे आश्वासन दिले. दर्यापूर शहरातील आणखी जी काही समस्या असेल त्यासुद्धा तातडीने मार्गी लावू, असेसुद्धा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
हेही वाचा :First Lady Sarpanch of Shinde Group : शिंदे गटाची राज्यात प्रथमच ग्रामपंचायतीवर सत्ता, 'या' ग्रामपंचायतीवर फडकविला झेंडा