अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने कुलसचिव आणि अधिष्ठाता नियुक्तीसाठी दिलेल्या जाहिरातीवर नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनने आक्षेप घेतला आहे. विद्यापीठ कायद्याच्या चौकटीत न बसणारी ही जाहिरात असून या जाहिरातीद्वारे १६ मे रोजी कुलसचिव आणि १७ मे रोजी होणारी अधिष्ठाता निवड प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
विद्यापीठाने दिलेल्या कुलसचिव, अधिष्ठाता नियुक्त्या रद्द करा; नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनची मागणी - demand
कुलसचिव पदाची जाहिरात प्रकाशित करताना विद्यापीठ प्रशासनाने कुलसचिव पदासाठी शैक्षणिक प्रशासकीय अनुभव हवा, केवळ इतकाच उल्लेख जाहिरातीत केला आहे. याचा नेमका अर्थ काय? शैक्षणिक प्रशासक म्हणून अनुभवाचा कालावधी किती हवा? असा कुठलाही उल्लेख जाहिरातीमध्ये केला गेला नाही.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर नियुक्ती झाल्याने त्यांनी अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा राजीनामा देऊन २३ जानेवारीला पदमुक्त झाले होते. यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने २८ जानेवारीला कुलसचिव पदासाठी जाहिरात काढली. कुलसचिव पदाची जाहिरात प्रकाशित करताना विद्यापीठ प्रशासनाने कुलसचिव पदासाठी शैक्षणिक प्रशासकीय अनुभव हवा, केवळ इतकाच उल्लेख जाहिरातीत केला आहे. याचा नेमका अर्थ काय? शैक्षणिक प्रशासक म्हणून अनुभवाचा कालावधी किती हवा? असा कुठलाही उल्लेख जाहिरातीमध्ये केला गेला नाही. अशा जाहिरातीमुळे विद्यापीठ प्रशासन त्यांच्या इच्छेनुसार एखादा उमेदवार योग्य आणि एखादा अयोग्य असे ठरवू शकते. विद्यापीठ कायद्यानुसार अशा स्वरूपाची जाहिरात नसते. कायद्यात न बसणाऱ्या या जाहिरातीनुसार आलेले सर्व अर्ज रद्द करून कुलसचिव निवड प्रक्रिया चुकीच्या नियमाने घेऊ नये, अशी मागणीही विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.
कुलसचिव पदासह विद्यापीठाने सायन्स अँड इंजिनियरिंग आणि ह्युम्यनिटीज या विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदासाठीही जाहिरात काढली आहे. ही जाहिरात काढताना कुलगुरू डॉ. मुरलीधार चांदेकर यांनी विद्यापीठ कायद्याच्या कलम १२ (८) या कुलगुरूंच्या अधिकारात असणाऱ्या कायद्यानुसार काढली आहे. अधिष्ठाता पदाची जाहिरात देताना परिनियम आणि अध्यादेशबाबत कुलगुरूंचे निर्देश हे विद्यापीठ कायदा २०१६ च्या कलम १४७ (२) (१) नुसार अस्तित्वात असणे गरजेचे आहे. या निर्देशाचा कालावधी ६ महिन्यात संपुष्टात येत असला तरी कुलगुरूंनी तो आणखी सहा महिने वाढविण्यासंदर्भात निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र असे काहीही न होता सरळ अधिष्ठाता पदासाठी जाहिरात देण्यात आले. यामुळे विद्यापीठ कायद्यानुसार ही जाहिरात बेकायदेशीर असल्याने या जाहिरातीनुसार अधिष्ठाता निवड प्रक्रिया राबविणेही बेकायदेशीर असल्याचे नुटाने म्हटले आहे. याबाबत नूटाचे अध्यक्ष प्रा. डी. प्रवीण रघुवंशी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. विवेक देशमुख, प्रा. डॉ. अर्चना बोबडे, डॉ. बी. आर. वाघमारे, प्रा दिलीप कडू यांनी कुलगुरु सुट्टीवर असल्याने आपल्या मागणीचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाला सादर केले. आम्ही विद्यापीठ प्रश्नाला दिलेल्या निवेदनाची योग्य अशी दाखल घेण्यात यावी. बेकायदेशीररीत्या कुलसचिव आणि अधिष्ठाता पद भरू नये याची काळजी कुलगुरूंनी घ्यावी, असे प्रा. डॉ. विवेक देशमुख 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.