अमरावती : पावसाळा सुरू झाला की मेळघाटातील अनेक रस्त्यांची दैनावस्था होते. दऱ्याखोऱ्यांत वसलेल्या मेळघाट परिसरात पुलांवरून पाणी आलं की संपर्क तुटतो. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात मुख्य मार्गावर एकूण ११८ पूल आहेत. यापैकी २० पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बनले आहेत. काही पूल ब्रिटिशकालीन असल्याने ते अक्षरशः मोडकळीस आले आहेत. अनेक पुलांची पावसामुळे दुरवस्था झालीय. तर अरुंद पूल असल्याने ते धोकादायक ठरताहेत. पुलावरून पाणी वाहत असल्यावर अनेक गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे अशा ठिकाणी नव्या पुलांची उभारणी करण्याची मागणी होत आहे. सध्या परतवाडा सीमाडोह रस्त्यावर असलेला भूतखोरा पूल पावसाने नुकसानग्रस्त झाल्याने या मार्गाची वाहतूक बंद करण्यात आलीय.
या पुलांच्या बांधणीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची परवानगी आवश्यक आहे. काही पुलांच्या बांधकामासाठी वनविभागाची परवानगी मिळाली आहे. तर काहींचा पाठपुरावा सुरु आहे. वनविभागाची परवानगी लवकर मिळत नसल्याने उर्वरित कामे थांबली असल्याने त्याचा पत्रव्यवहार सुरु असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांनी सांगितले आहे.
आदीवासी त्रस्त