अमरावती -हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जितका जबाबदार उपवनसंरक्षक शिवकुमार आहे तितकाच अपर प्रधान उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी आहे. दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात रेड्डीच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. असे असताना राज्य सरकार रेड्डीची बदली नागपूरला करते. खरंतर रेड्डीची नागपूरला झालेली बदली ही राज्य शासनाकडून मिळालेली शाबासकीच आहे, असा आरोप भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अश्विनी जिचकार यांनी आज अमरावतीत पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
हेही वाचा -मुरूड महिला पोस्टमास्तरची आत्महत्या, दीपाली चव्हाण प्रकरण ताजे असतानाच घडली दुसरी घटना
तिघाडी सरकारमध्ये महिला असुरक्षित
राज्यात असणाऱ्या तिघाडी सरकारच्या कार्यकाळात महिला कुठेही सुरक्षित नाहीत. महिलांच्या सुरक्षेबाबत हे सरकार गंभीर नसल्याचा आरोप अश्विनी जिचकार यांनी केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर या सरकारचा वचक नाही. हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे, असे आमचे ठाम मत असून रेड्डी गुन्हेगार असताना त्याला अमरातीतून नागपूरसारख्या शहरात पाठवणे ही कसली शिक्षा? हा कसला न्याय? असा सवाल अश्विनी जिचकार यांनी केला.