अमरावती- लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती 2020 मध्ये जितकी गंभीर आहे, तितकी यापूर्वी कधीही नव्हती, असा आरोप भाजप नेत्यांनी गुरुवारी केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, पीक कर्ज द्या अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालय येथून भाजपने जिल्हा बँकेवर मोर्चा काढला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ताट-वाटी वाजवून आंदोलनाकडेशासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधले.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आणि शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते एकत्र आलेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भाजप कार्यकर्त्यांनी ताट-वाटी वाजवून शासनाचा निषेध नोंदवला. यानंतर भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून इर्विन चौक येथील जिल्हा बँकेवर धडकला. जिल्हा बँकेच्या सभागृहात निवेदिता चौधरी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थितीबाबत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माहिती दिली.