अमरावती - अमरावती - वर्धा जिल्ह्याच्या सिमेवरील, जिल्ह्यातील शेवटचे गाव असलेल्या जुनी भारवाडी या गावात काही दिवसांपूर्वी कोरोनाने जणू उच्छाद मांडला होता. केवळ तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या या गावात केवळ दोन आठवड्यांत कोरोनाचे तबल 57 रुग्ण आढल्याने प्रशासनाची झोप उडाली होती. गाव कोरोनाच्या दहशतीखाली वावरत होते. मात्र त्याच वेळी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन व गावकऱ्यांनी कोरोनाला आता थांबवायचे हा निर्णय घेतला आणि गावासाठी व स्वतःच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुरु केल्या. कोरोना नियमांची कडक अंबलबजावणी गावात अंमलात आणली. त्याचाच फायदा हा जुनी भारवाडी या गावाला झाला. १५ दिवसात ५७ कोरोना बाधित आढळणाऱ्या या गावात मात्र एक महिन्यापासून एकही नवा कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही.
१५ दिवसांत ५७ कोरोनाबाधित आढळले -
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील जुनी भारवाडी हे जवळपास 350 लोकवस्तीचे गाव आहे. मागील एक वर्षांपासून देशात कोरोनाचे सावट आहे. खेड्यापाड्यातील गावोगावी कोरोना शिरकाव झाला. पण भारवाडी या गावाने ११ महिने कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखले होते. पण यंदा अखेर २५ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला आणि गावात खळबळ उडाली. तेथून तीन दिवसात लगेचच आणखी तीन नव्या रुग्णांची भर त्यात पडली होती. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभागासमोर आव्हान उभे होते. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत या गावात कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. त्यात तबल २७ जण नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तेथून तीन दिवसांनी पुन्हा कोरोना चाचण्या घेण्यात आल्या तेव्हा पुन्हा १० कोरोना बाधित आढळून आले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. तेव्हा १७ जण नवे रुग्ण सापडले होते त्यामुळे केवळ १५ दिवसांत ५७ कोरोनाबाधित आढळणारे जिल्ह्यातील एकमेव गाव जुनी भारवाडी असावे. या गावांतील लहान बालके वगळले तर १०० टक्के लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या. जवळपास ३५० लोकसंख्या असलेल्या या गावात एकूण २३१ चाचण्या केल्या गेल्या.
गाव प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित -
गावात १५ दिवसांत ५७ रुग्ण आढल्याने कमालीची भीती पसरली होती. त्यामुळे गावात जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरांवरील आरोग्य अधिकारी यांनी भेटी दिल्या. गावांतील लोकांचे समुपदेशन केले. त्यांना आरोग्य विभागाने योग्य तो औषध साठा दिला. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढल्याने गाव प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केले. त्यामुळे गावाबाहेर व्यक्तीला गावात प्रवेश नव्हता तर गावातील व्यक्ती गावाबाहेर जात-येत नव्हती.
गावात वेळोवेळी पाहणी, तपासणी व फवारणी -