अमरावती- आयुष्याचे सुंदर स्वप्न रंगवण्याच्या काळातच दुर्दैवाने वयाच्या दहाव्या वर्षीच एका असाध्य आजाराने नवसारी भागात राहणारे नरेंद्र उके यांचे दोन्ही डोळे निकामी झाले. आपण दोन्ही डोळ्यांनी अपंग आहोत याची खंत त्यांनी कधीच मनात ठेवली नाही. आयुष्यात कधी कुणासमोर मदतीसाठी हात पुढे न करता आपल्या स्वतःच्या अंगी असलेल्या कारागिरीच्या उत्तम गुणांमुळे त्यांनी आपल्या आयुष्यातील अडचणींवर सहज मात केली.
त्याच्या 'जिद्दी'समोर दोन्ही डोळ्यांचे अपंगत्वही हरले...
वयाच्या दहाव्या वर्षीच एका असाध्य आजाराने नवसारी भागात राहणारे नरेंद्र उके यांचे दोन्ही डोळे निकामी झाले. मात्र, आयुष्याशी अविरत झुंजत त्यांनी कधी कुणासमोर मदतीसाठी हात पुढे न करता आपल्या स्वतःच्या अंगी असलेल्या कारागिरीच्या उत्तम गुणांमुळे आपल्या आयुष्यातील अडचणींवर सहज मात केली. आज जागतिक अपंग दिनानिमीत्त त्यांच्याशी 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने साधलेला संवाद....
नरेंद्र उके हे डोळ्यांनी जरी अंध असले तरी ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबरच नळ फिटिंग, इलेक्ट्रिकल फिटिंग, पीओपीमधील फिटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग सह अनेक जोखमीची कामे करतात. शरीराने अपंग असलेल्या व्यक्ती आयुष्यात खचून जातात. पण आपण अपंग असल्याचा कमीपणा न बाळगता ताठ मानेने आपल्याला येईल ते काम जिद्दीने करावे, असा सल्ला नरेंद्र इतर अपंग बांधवांना देतात. नरेंद्र हे अंध असले तरी त्यांच्या जिद्दीने त्यांना कधीच स्वस्थ बसू दिले नाही. म्हणून त्यांच्या दुकानाचे नावही त्यांनी "जिद्द" रिपेरींग सेंटर असेच ठेवले आहे.
नरेंद्र हे फक्त एक चांगले कारागीरच नाहीत तर त्यांनी शिक्षणातही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. दहावीच्या वर्गात असताना त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला होता. नरेंद्र यांनी इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी बीएड, एमएड सुद्धा पूर्ण केले. अलीकडेच एका महाविद्यालयात चार वर्षे प्राध्यापक व दोन वर्षे त्यांनी प्राचार्यपद सांभाळले. त्यांच्या या उच्च शिक्षणाचा त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा फायदा होतो. यामुळेच त्यांची मुले आमचे बाबा आमच्यासाठी "गुगल मॅन" असल्याचे आदराने सांगतात. हातात असलेल्या कलेमुळेच दुर्दैवाने आलेल्या अंधत्वावर मात करून नरेंद्र यांची जिद्द ही आजही त्यांच्या कार्याला ऊर्जा देते. ते करत असलेले कार्य आज प्रत्येक अपंग बांधवाला प्रेरणा देणारे ठरणार आहे.