अमरावती -अमरावती शहरात धृतगती महामार्गापासून वडद शेतशिवरलागत तरुणाची चाकू भोसकून हत्त्या करून मृतदेह जाळण्यात आल्याचा प्रकार रविवारी दुपारी समोर आला. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने पाच आरोपींना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून अटक केली आहे. आरोपींना न्यायलायसमोर आज हजर केले असता त्यांना 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अशी आहेत आरोपींची नावे
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेलपुरा परिसरात राहणाऱ्या रोहन उर्फ बच्चू वानखडे (वय 21) याची हत्या करण्याप्रकरणात राजापेठ परिसरातील रहिवासी आकाश दिलीप मोरे (वय 26), करण कैलास इटोरिया (वय 21), रोहित अमोल मांडळे (वय 20), बेलपुरा परिसरातील रहिवासी प्रशांत उर्फ सोनू लक्ष्मण चावरे (वय 21) आणि कल्याण नगर परिसरातील रहिवासी नितेश नारायण पिवाल (वय 26) हे पाच आरोपी आहेत.
भाजलेल्या अवस्थेत मृतदेह होता पडून
29 मे रोजी दुपारी 4 वाजता पाचही आरोपी बच्चू वानखडेच्या घरी आले होते. त्यांनी बच्चू वानखडेला सोबत बाहेर नेले. तेव्हापासून बच्चू वानखडे घरी परतला नाही. याबाबत बच्चूच्या घरच्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. दरम्यान, धृतगती महामार्गापासून काही अंतरावर वडद शेतशिवारात भाजलेल्या अवस्थेत मृतदेह पडून असल्याचे काही गुराख्यांना आढळून आले. त्यांनी याबाबत बडनेरा पोलिसांना माहिती दिली. बडनेरा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला असता हा मृतदेह बच्चू वानखडेचा असल्याचे स्पष्ट झाले.