अमरावती -मनुष्य आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातील सुरक्षा पथक हा एक महत्त्वाचा दुवा आहे. मानवी वस्तीत शिरणाऱ्या वन्यजीवांना वनामध्ये सुरक्षित स्थळी पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी हे पथक बजावीत आहे. महाराष्ट्रातील सर्वात सक्षम असे वन्यजीव सुरक्षा पथक म्हणून अमरावतीच्या पथकाचा नावलौकिक आहे.
दोन वर्षात अनेक मोहिमा फत्ते -
6 ऑगस्ट 2019 रोजी अमरावती वन्यजीव बचाव पथकाच्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन झाले. मात्र, या बचाव पथकाचे कार्य 2013 पासून अतिशय जोमाने सुरू आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नन्नवरे यांच्या नेतृत्वात वनरक्षक अमोल गावनेर, मनोज माहुलकर, वनपाल सुरेश मनगटे, फिरोज खान, वनमजूर सतीश उमक, मनोज ठाकूर,मारुती कथलकर आणि रोजंदारीवर असणाऱ्या दोन वाहन चालक आणि एक मजूर या पथकात कार्यरत आहेत. अमरावती शहर आणि जिल्ह्यासह जळगाव, भुसावळ, पैठण, चाळीसगाव, यवतमाळ, पांढरकवडा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली अशा विविध भागात मानवी वस्तीत शिरलेल्या वन्यप्राण्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पोहोचविण्याची जबाबदारी अमरावती वनविभागाच्या या बचाव पथकाने आजवर अनेकदा पूर्ण केली असल्याची माहिती या पथकाचे प्रमुख वनपाल अमोल गावंनेर यांनीही 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
बचाव पथक अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज -
आपले नैसर्गिक अधिवास सोडून अनेकदा वन्यप्राणी हे मानवी वस्तीत शिरतात, अशा प्रसंगात वन्य प्राणी आणि मानव यांचा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाचे बचाव पथक आपल्या प्राणाची बाजी लावून वन्यप्राण्यांना मानवी वस्तीतून सुरक्षित बाहेर काढतात. यावेळी अनेक अडचणींचा सामना करताना या बचाव पथकाकडे सुसज्ज असे शास्त्रही शासनाच्यावतीने पुरविण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी अशा शस्त्रांचा वापर केला जातो. आता नव्याने या पथकाकडे अमेरिकेतील ब्लूडार्ट कंपनीने निर्माण केलेली एक रायफल आणि एक पिस्टल देण्यात आली आहे. या अत्याधुनिक शास्त्रामुळे या पथकाला आपले कर्तव्य बजावताना येणाऱ्या अडचणींवर सहज मात करता येते.