अमरावती -अमरावती शहरातील बिल्डर तसेच व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणारे महापौर ( Amravati Shivaji Maharaj Statue Remove ) आणि सर्व पक्षाचे गटनेते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाच्यावतीने उचलला जात असताना गप्प होते, असा आरोप करत सुमती ढोके, सपना ठाकूर आणि आशिष गावंडे या युवा स्वाभिमान संघटनेच्या नगरसेवकांनी महापौरांचा निषेध नोंदवित नगरसेवक पदाचा ( Yuva Swabhiman Corporator Resign In Amravati ) राजीनामा दिला आहे.
नगरसेवकांनी काय केला आरोप -
राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली होती. शहरातील सर्व शिवभक्तांना राजापेठ उड्डाणपुलावर महाराजांचा पुतळा स्थापन झाल्याबाबत अभिमान वाटत होता. असे असताना महापालिका प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उड्डाणपुलावरून हटविला. हा प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांचा हवामान असून भाजपाची सत्ता महापालिकेत असताना असा प्रकार होत असल्यामुळे भाजपाच्या सर्व नगरसेवकांचा आम्ही निषेध नोंदवतो, असे सुमती ढोके आणि आशिष गावंडे म्हणाले. महापालिका प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सध्या भंगारात ठेवला असून या प्रकाराचा मी निषेध नोंदवते, असेही सुमती ढोके म्हणाल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी राजीनामा -
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त असून छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला वंदनीय आहेत. महापालिका प्रशासनाने राजापेठ उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून शिवभक्तांचा अवमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणाऱ्या महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवत आम्ही हा राजीनामा देत असल्याचे नगरसेविका सपना ठाकूर यांनी म्हटले.
युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा धुमाकूळ -
राजापेठ उड्डाणपुलावर बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिका प्रशासनाने हटविण्याच्या निषेधार्थ युवा स्वाभिमान संघटनेचे तीन नगरसेवक आज राजीनामा देण्यासाठी महापालिकेत आले असताना युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धुमाकूळ घातला. यावेळी महापालिका आयुक्तांसाठी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आणलेली साडी आणि बांगड्या महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने भिरकावल्या. यावेळी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच तैनात पोलिसांवर या बांगड्यांचा मारा बसला. या घटनेत दोन महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धुमाकूळ घालणाऱ्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
हेही वाचा -Amravati Yava Swabhiman Agitation : युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर भिरकावल्या बांगड्या; मनपा मोठा बंदोबस्त