अमरावती :28 जुलै 1923 रोजी स्थापन झालेल्या (Vidarbha College) 'विदर्भ महाविद्यालय' या ब्रिटिशकालीन (British) महाविद्यालयाला यावर्षी 28 जुलै रोजी शंभर (hundred years of glorious history) वर्षे पूर्ण झालेत. 168 एकर परिसरात विस्तार असलेल्या तेव्हाच्या किंग एडवर्ड आणि आत्ताच्या विदर्भ महाविद्यालयाचा प्रवास खूपच रंजक आहे. इंग्रजांनी (which bears witness to hundred years) शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते, म्हणूनच त्यांनी त्यांच्या काळात भारतामध्ये शाळा महाविद्यालयांची मुहूर्तमेढ रोवली होती.
प्रतिक्रीया देतांना विदर्भ महाविद्यालयाच्या संचालक अंजली देशमुख साहित्य, शासन, प्रशासन, संशोधन, शिक्षण, राज्यसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, पोलीस प्रशासन, न्यायव्यवस्था, वैद्यकीय, कृषी, सांस्कृतिक, अर्थ, वाहतूक, संरक्षण, सामाजिक असे कुठलेच क्षेत्र नसेल की ज्या क्षेत्रात या महाविद्यालयाचे विद्यार्थी नसतील. बहुविध क्षेत्रात भरीव योगदान देणारे विद्यार्थी ज्या महाविद्यालयाने घडविले; ते म्हणजे अमरावतीचे (Amravati) 'विदर्भ महाविद्यालय' (Vidarbha College). आमदार खासदारच नव्हे तर राज्यपाल आणि नामवंत साहित्यिक सुद्धा घडले ते याच महाविद्यालयात.
महाविद्यालय स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्ती :6 मे 1910 ला किंग एडवर्ड यांचे निधन झाले. 13 सप्टेंबर 1910 रोजी अमरावती वऱ्हाडातील काही लोकांनी एकत्र येऊन किंग एडवर्ड यांच्या स्मरणार्थ एक सभा घेतली. या सभेमध्ये प्रामुख्याने राव बहादुर रंगनाथ नरसिंह मुधोळकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पाटणाचे अध्यक्ष,1912) सर मोरोपंत जोशी ( वऱ्हाड व मध्यप्रांताचे पहिले गृहमंत्री 1920-26), रावबहादूर रा.मो.खरे, दिवाण बहादुर ब्रह्म, बाबासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी, न्यायाधीश मंगलमूर्ती, वाय.जी. देशपांडे, शिवाजीराव पटवर्धन, ना.रा. बामनगावकर, रामराव देशमुख यांनी महाविद्यालय स्थापन करण्यास पुढाकार घेतला. याच बैठकीत 1 लाख 29 हजार 911 ची वर्गणी गोळा करण्यात आली.
अशी झाली महाविद्यालयाची पायाभरणी :तेव्हाच्या सी.पी. बेरार प्रांताचे मुख्य आयुक्त सर बेंजामिन रॉबर्टसन यांच्या हस्ते, 23 नोव्हेंबर 1918 रोजी महाविद्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. 1922 ला महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. 28 जुलै 1923 रोजी सी.पी.अँड बेरार प्रांताचे गव्हर्नर सर फ्रॅंक स्लाय यांच्या हस्ते आणि तत्कालीन शिक्षण मंत्री रा.ब. नारायणराव खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत किंग एडवर्ड कॉलेज असे या महाविद्यालयाचे नामकरण करण्यात आले.
14 जानेवारी 1925 ला किंग एडवर्ड सोसायटीची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयाकडे जमा झालेला निधी या सोसायटीकडे हस्तांतरित करण्यात आला. या निधीच्या व्याजातून गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, असे ठरण्यात आले.
असे सुरू झाले महाविद्यालय :83 विद्यार्थी आणि 10 प्राध्यापकासह 28 जुलै 1923 ला महाविद्यालय सुरू झाले. महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी मी.एफ. पी. टोस्टविन यांनी सांभाळली होती. सन 1941 पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. अत्यंत शिस्तप्रिय असलेल्या प्राचार्य टॉस्टवीन यांचा महाविद्यालयात प्रचंड दरारा व तेवढीच प्रतिष्ठा सुद्धा होती. अल्पावधीतच किंग एडवर्ड कॉलेज संपूर्ण महाराष्ट्रात नावा रूपास आले. नंतरच्या काळात लेफ्टनंट कर्नल गांगुली, डॉ. कृष्णमूर्ती, डॉ.ना.गो. शब्दे, डॉ. विवेक कोलते अशा नामवंतांनी या महाविद्यालयाचे प्राचार्य पद भूषविले होते.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलन आणि किंग एडवर्ड कॉलेज :क्रांतिकारी भगतसिंग यांचे सहकारी जितेंद्रनाथ दास यांनी तुरुंगात उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या 62 व्या दिवशी 13 सप्टेंबर 1929 रोजी ते शहीद झाले. या घटनेचे पडसाद किंग एडवर्ड महाविद्यालयातही उमटलेत. देशप्रेमाच्या भावनेने प्रेरित होऊन येथील विद्यार्थ्यांनी संप पुकारला होता. ग्रामीण भागातूनही या संपाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठा मोर्चा काढून प्राचार्य टॉसटविन यांच्याविरोधात घोषणा दिल्या होत्या. प्राचार्यांच्या साम्राज्यवादी वृत्तीला आव्हान दिले होते विद्यार्थ्यांनविना महाविद्यालय ओस पडले होते. हातात तिरंगी झेंडे घेऊन भारत माता की जय, हुतात्मा जितेंद्र दास अमर रहे ..अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.
सुभाष चंद्र बोस यांचे झाले होते भाषण :नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 1931 मध्ये तुरुंगातून सुटका झाली होती. त्यांच्यावर 124 अ कलमा नुसार राजद्रोहाचा खटला सुरू होता. विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात नेताजी सुभाष चंद्र बोस यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलण्याचा आग्रह धरला होता. यावरून प्राचार्य आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संघर्ष उफाळून आला होता. ब्रिटिश सरकार विरुद्ध राजद्रोह आणि बंडाची भूमिका घेणारा या परिसरात येऊ शकत नाही, अशी भूमिका तत्कालीन प्राचार्य यांनी घेतली होती. शेवटी विद्यार्थीही जिद्दीला पोहोचलेत आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भाषण महाविद्यालयात झाले खरे. पण नेताजींना महाविद्यालयात आणणारे विद्यार्थी व लक्ष्मीनारायण मालानी यांना महाविद्यालयातून बाहेर काढण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलन आणि किंग एडवर्ड कॉलेज :तत्कालीन वृत्तपत्रांनी किंग एडवर्ड महाविद्यालयातील स्वातंत्र्य आंदोलन चळवळीमधील घटनांची नोंद घेतलेली आहे. प्राचार्य टॉस्टवीन यांना धमकी देणारी पत्रे नोटीस बोर्डवर लावण्यात आली होती. 'क्रांती चिरायु हो' अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी पूर्व वस्तीगृहावर राष्ट्रीय ध्वज लावला होता. काही विद्यार्थ्यांवर कारवाई करून त्यांना महाविद्यालयातूनबाहेर काढण्यात आले होते. 1930 मध्ये दादासाहेब खापर्डे यांनी एक बैठक घेऊन विद्यार्थ्यांवर राजकिय सुड उगवू नये, अशी सूचना केली होती. 1940 मध्ये महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व प्रसिद्ध साहित्यिक विद्याधर गोखले हे भूमिगत चळवळीत सहभागी झाले होते. याच दरम्यान सुरू असलेल्या सविनय कायदेभंग चळवळी मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याच्या नोंदी आहे. विद्यार्थी आंदोलने दडपण्याचा परिणाम म्हणून प्राचार्य टॉस्टविन यांची नागपूर येथे बदली करण्यात आली होती.
किंग एडवर्ड चे झाले विदर्भ महाविद्यालय :15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर भारतातील बऱ्याच इमारती, संस्था, प्रतिष्ठाने यांचे मोठ्या प्रमाणात नामकरण झाले. त्याच प्रमाणे किंग एडवर्ड कॉलेज चे नामांतर होऊन ते 'विदर्भ महाविद्यालय' झाले. किंग एडवर्ड यांच्याऐवजी महात्मा गांधी यांचा फोटो लावण्यात आला. बेंजामिन रॉबर्टसन यांच्या फोटो ऐवजी लोकमान्य टिळक यांचा फोटो तर फ्रॅंक स्लाय यांच्या फोटोच्या ऐवजी रवींद्रनाथ टागोर यांचा फोटो लावण्यात आला.
स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना :काळ्याशार दगडांचा वापर करून बांधलेली महाविद्यालयाची वास्तू शिक्षण, संस्कृती यांचा वारसा आणि इतिहास सांगणारी आहे. ही वास्तू म्हणजे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आज शंभर वर्ष पूर्ण होऊन सुद्धा ही वास्तू डौलदारपणे उभी आहे. 168 एकर एवढा विस्तीर्ण परिसर असलेल्या महाविद्यालयाच्या आवारात प्रसासकीय इमारत, ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी 2 तर विद्यार्थिनींसाठी 3 स्वतंत्र वस्तीगृह , कर्मचारी निवास एनसीसी भवन, भले मोठे खुले प्रांगण, विस्तीर्ण असे अप्सरा उद्यान, 1100 प्रेक्षक क्षमतेचे संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृह, यांसह अन्य विभागाच्या इमारती आहेत.
यांनी घेतले येथे शिक्षण :विश्राम बेडेकर, पद्माकर निमदेव, सुरेश भट, राम शेवाळकर, विद्याधर गोखले, सुरेश भट, रा. सु. गवई, विदर्भ वीर जामुवंतराव धोटे, देविदास सोटे, लोकसभा सदस्य त्र्य. गो. देशमुख, माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक, माजी आमदार बी.टी.देशमुख, डॉ. देवसिंग शेखावत ,अनिल वऱ्हाडे, माजी आमदार जगदीश गुप्ता, आमदार यशोमती ठाकूर असे शेकडो नामवंतचा उल्लेख करता येईल.
मी खूप भाग्यवान आहे - डॉ.अंजली देशमुख :आज महाविद्यालयात 4755 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 58 विद्यार्थी संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये आले असून, 9 विद्यार्थी सुवर्णपदकाने सन्मानित झाले आहेत. 61 विद्यार्थ्यांनी नेट सेट आणि गेट ही राष्ट्रीय परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 200 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप दिल्या जात आहेत. 313 विद्यार्थी संशोधनाचे काम करतात. महाविद्यालयातुन 22 पदवी अभ्यासक्रम 19 पदव्युत्तर अभ्यासक्रम तर 21 विषयांमध्ये संशोधन होत असल्याची, माहिती संचालक डॉक्टर अंजली देशमुख यांनी दिली.
मी स्वतः ला भाग्यवान समजते की, ज्या महाविद्यालयातून मी शिक्षण घेतले. त्याच महाविद्यालयाची संचालक म्हणून सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. अंजली देशमुख यांनी ईटीव्ही शी बोलतांना दिली.
हेही वाचा :लोकमान्य टिळकांच्या स्वदेशीच्या विचारानेच अग्नी क्षेपणास्त्राचा पाया; डॉ. टेसी थॉमस यांचे मत