अमरावती -पंतप्रधानांच्या स्पेशल स्कॉलरशीप योजनेंतर्गत जम्मू- काश्मीरमधील अतिशय दुर्गम भागत राहणारे युवक आज उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येऊन देशाच्या विविध भागात आता देश हिताचे कार्य करीत आहेत. या विशेष योजनेसाठी मी दोन वर्ष जम्मू-काश्मिरातील दुर्गम भागात युवकांना शिक्षणासाठी प्रेरित करण्याचे काम केले. जम्मू-काश्मिरातील दुर्गम भागात राहणारे युवक उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकतात. मग आपल्याकडे युवकांना उच्चशिक्षणासाठी प्रेरित करणे अवघड मुळीच नाही. माझ्या अनुभवाच्या आधारावरच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून आता या विद्यापीठात केवळ विद्यार्थी घडणार नाही, तर आम्ही आता आमच्या विद्यापीठात क्रिएटर निर्माण करू, असा संकल्प संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु प्रा.डॉ. दिलीप मालखेडे यांनी व्यक्त केला.
डॉ. मालखेडेंनी स्विकारला कुलगुरूपदाचा पदभार -
पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असलेले डॉ. दिलीप मालखेडे यांनी आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आठवे कुलगुरू म्हणून पदभार स्विकारला. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्याकडे 1 जून 2021 पासून असणारा अमरावती विद्यापीठाचा प्रभार त्यांनी आज डॉ. दिलीप मालखेडे यांना सोपविला. एक जून 2019 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त होते.
'आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागतील' -
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून आज मी पदभार स्वीकारतो आहे. न्याकचे 'ब' नामांकन या विद्यापीठाला मिळाले आहे. त्यामुळे या विद्यापीठात बरीच कामे करण्याचा स्कोप आहे. मी अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी असल्यामुळे या भागातील प्रश्न, अडचणी मी समजू शकतो. आज या विद्यापीठात शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे अनेक अडथळे कामात येऊ शकतात. हे सर्व अवघड असले तरी आपले प्रश्न सोडविण्यासाठी कोणी फ्रान्स, जर्मन किंवा अमेरिकेतून येणार नाही. आपले प्रश्न आपल्यालाच सोडवायचे असल्यामुळे त्यावर योग्य मार्ग काढणे हाच एकमेव पर्याय आहे. माझे वैयक्तिक मत मी सर्वांवर लादू शकत नाही. मात्र, आपल्या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला विकासात्मक वळण देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यापीठातील सर्व सहकारी माझ्या विचारांना साथ देतील आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ एक आदर्श विद्यापीठ म्हणून नावारूपास येईल, अशी मला खात्री असल्याचे डॉ. दिलीप मालखेडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.