अमरावती- प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळावे हा त्याचा हक्क आहे. असे असतानाही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेत येत नाही, हे कटू सत्य आहे. चांगले शिक्षण मिळावे यासाठी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विचारणा करणाऱ्या विद्यार्थ्याला तावडेंनी अपमानित केले होते. त्या प्रसंगाचे चित्रीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश विनोद तावडे यांनी पोलिसांना दिले होते. मात्र, तेच दोन विद्यार्थी आता संत गाडगेबाबा विद्यापीठातून पत्रकारितेच्या पदवी परीक्षेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
अमरावतीतील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात जानेवारी महिन्यात माणिकराव घवळे वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे अमरावती येथे आले होते. मंत्र्यांचे भाषण संपल्यावर पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारण्यासाठी मंत्र्यांचे लक्ष वेधले. आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय, असा प्रश्न प्रशांत शिवा राठोड या विद्यार्थ्याने विचारला. मात्र, तावडे यांना तो प्रश्न चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यावर त्या विद्यार्थ्याला अपेक्षित उत्तर देण्याऐवजी तावडे यांनी विद्यार्थ्याला 'तुला झेपत नसेल तर शिक्षण सोडून दे अणि नोकरी कर', असे उत्तर दिले होते. आणि त्याच वर्गातील दोन विद्यार्थी त्या प्रसंगांचे चित्रीकरण करत होते. त्या विद्यार्थ्यांना तावडेंनी थेट अटक करण्याचेच आदेश दिले होते. विद्यार्थ्यांना अपमानित करणाऱ्या तावडेंना आज प्रशांत आणि युवराज या दोन विद्यार्थ्यांनी अमरावती विद्यापीठातून पत्रकारितेच्या पदवी परीक्षेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उत्तर दिले आहे. त्यानंतर त्यांनी तावडेंवर थेट हल्ला चढवत आम्ही शिकलो आणि परत आलो. पण तावडे साहेब तुम्ही मात्र घरी गेलात, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
हेही वाचा -नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून विद्यार्थिनीने नाकारले सुवर्णपदक!