अमरावती - एखाद्या नवीन शहरात गेल्यास त्या शहराबद्दल आपणास पूर्ण माहिती नसते, अनेकदा आपल्याला ज्या ठिकाणावर पोहचायचे असतं त्या ठिकाणचा रस्ता किंवा निश्चित स्थळ माहित नसते. त्यामुळे अनेकदा आपण त्या परिसरातील दुकानदारांना त्या जागेचा पत्ता विचारतो. त्यावेळी दुकानदारही आपल्याला सहज त्या ठिकाणचा पत्ता सांगतो, हा सर्वांनाच येणारा अनुभव आहे. पंरतु अमरावतीमध्ये मात्र एका घड्याळ व्यावसायिकाला पत्ता विचारणे म्हणजे तुमच्याच खिशाला कात्री लावून घेण्याचा प्रकार आहे. कारण या घड्याळ दुकानदारास जर एखाद्याने पत्ता विचारलाच तर त्याला त्यासाठी पैसे मोजावे लागतात. तशीच पाटीच लावली आहे या दुकानादाराने, या मागे नेमके काय कारण आहे, याबाबत ईटीव्ही भारतने केलेला हा विशेष वृत्तांत..
पत्ता विचारण्यासाठी 'पाच' रुपये, पुणे शहरात लोक अनेकदा आगळ्यावेगळ्या पाट्या लावून लक्ष वेधत असतात. त्यामुळे पुणेरी पाट्या सातत्याने सोशल मीडियावर आणि माध्यमात चर्चेचा विषय ठरत असतात. मात्र आता अमरावती मधील घड्याळ व्यवसायिक रघुनाथ सावरकर यांनी भन्नाट कल्पनेतून लावलेली ही पाटीही चर्चेचा विषय ठरली असून सोशल मीडियावर देखील ही पार्टी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे.
अन् पुढच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी द्यावे लागतात दहा रुपये
शहरातील जवाहर गेट मार्गावर एक घड्याळाचे दुकान आहे. जर एकादा प्रवासी अथवा अनोळखी व्यक्तीने या घड्याळ विक्रेत्यास एखाद्या ठिकाणचा पत्ता विचारला तर त्याला पाच रुपये द्यावे लागतात. मात्र पाच रुपये कशाचे? हा दुसरा प्रश्न विचारल्यानंतर मात्र पत्ता विचारणाऱ्या त्या व्यक्तीला या दुकानदाराला दहा रुपये द्यावे लागतात, तशी पाटीच या दुकानदाराने आपल्या दुकानावर लावली आहे. सातत्याने पुणेरी पाट्या या नेहमी चर्चेत राहत असतात. परंतु अंबानगरीतल्या एका छोट्या घड्याळ व्यावसायिकाने आपल्या दुकानावर लावलेली पाटी मात्र सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे.
अमरावतीमध्ये राहणारे रघुनाथ सावरकर यांचे अमरावतीच्या जयस्तंभ चौक परिसरात गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या कडेला एक छोटस घड्याळ विक्रीचे दुकान आहे. या दुकाना पासूनच जवळपास जवाहर गेट, सराफा मार्केट, मोची गल्ली, इतवारा अशा अनेक मोठ्या बाजारपेठा आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून येणारे लोक या भागातील काही ठिकाणांची माहिती सातत्याने या दुकानदाराला असतात. तेव्हा रघुनाथ सावरकर हे त्यांना सहजपणे पत्ता सांगत होते. परंतु अनेक लोक बारीक-सारीक विचारपूस करून नाहक त्रास देत असल्याचा त्यांना अनुभव आला. '
त्या पैशातून जपली सामाजिक बांधिलकी -
सावरकर हे दुकानात काम किंवा ग्राहक करत असताना अनेक लोक वारंवार त्यांना पत्ता विचारायला यायचे, त्यामुळे ग्राहकांशी बोलताना त्यांना अडचणी येत होत्या, असे सावरकरांचे मत आहे. त्यामुळे नाहक प्रश्न विचारत राहणाऱ्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी या दुकानदाराने चक्क एक पाटी लावली आहे. त्या पाटीवर एक असा मजकूर आहे "पत्ता विचारायचे पाच रुपये लागतील हे असे का लिहिले आहे हे सांगायचे दहा रुपये लागतील' अशा आशयाची पाटी या दुकानदाराने लावली आहे. दरम्यान मिळालेल्या पैशातून हा दुकानदार परिसरातील भिकार्यांना मदत करत सामाजिक बांधिलकी जपत असतो.