अमरावती -फेब्रुवारी 2022मध्ये अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एक सदस्यीय प्रणालीने होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रशासनाला निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले असून महापालिका प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.
आठ सदस्यीय समिती गठीत -
एक सदस्यीय प्रणालीने महापालिका निवडणूक होणार असून त्यासाठी योग्य प्रभाग रचना करण्यासाठी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत मनपा उपायुक्त सुरेश पाटील, नगररचना सहसंचालक आशिष उईके, मनीष हिरीडे, बांधकाम विभागातील सुधीर गोटे आणि हेमंत महाजन हे दोन शाखा अभियंता, सिस्टीम मॅनेजर अमित डोंगरे आणि सहायक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे यांचा समावेश आहे.
'वॉर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करणार' -
राज्य शासनाने 31 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या महापालिका अधिनियम 2019 अन्वये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग प्रणाली लागू करण्यात आली आहे. प्रभाग रचना करताना 2011 ला अमरावती शहराची लोकसंख्या जी 6 लाख 47 हजार 57 इतकी होती. ही लोकसंख्या विचारत घेतली जाणार असून दहा वर्षात वाढलेल्या लोकसंख्येचाही विचार करून शहरात 86 प्रभाग राहणार आहेत. विधानाभ निवडणुकीतील मतदार याद्यांवरून एकसदस्यीय वॉर्डची रचना करण्यात येणार आहे. या संपूर्ण वॉर्ड रचनेचा कच्चा आराखडा पहिल्या टप्प्यात तयार केला जाणार आहे.