अमरावती -ओबीसी आरक्षण (OBC Reservation) पुन्हा बहाल व्हावे, यासाठी राज्य सरकारने काढलेल्या वटहुकुमाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असल्याने आता अमरावती महापालिका निवडणुकीवर (Amravati Municipal Corporation Election) ही त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे सर्वच पक्षांची गणिते ही बिघडण्याची शक्यता असताना यासंदर्भात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना आपली बाजू मांडली.
काँग्रेसला तोडगा निघेल अशी अपेक्षा -
ओबीसींना आरक्षण बहाल करण्यासाठी राज्य शासनाने काढलेल्या वटहुकुमाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी महापालिका निवडणुकीपर्यंत राज्य शासन यावर योग्य, असा तोडगा काढेल, अशी अपेक्षा काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि अमरावती महापालिकेतील विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी व्यक्त केली. निवडणुकीपर्यंत ओबीसी आरक्षणासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही तर सध्यास्थितीत ज्याप्रमाणे ओबीसींना आरक्षण आहे, त्याचप्रमाणे आम्ही प्रभागात ओबीसी उमेदवारांना संधी देऊ, असेही बबलू शेखावत यांनी स्पष्ट केले.
'राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते संसदेच्या अधिवेशनात तोडगा निघेल' -
महापालिकेच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळणे ही सर्वच पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसे झाल्यास संसदेतच या महत्त्वाच्या विषयावर तोडगा निघेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजेंद्र महल्ले म्हणाले.