अमरावती : खेड्याकडे चला या महात्मा गांधींच्या संदेशाचे पालन करत अमरावती जिल्ह्यातील महिलांनी "कापूस ते फॅशन" असा प्रवास कसा सार्थ होऊ शकतो हे त्यांच्या कृतीतून सिध्द केलं आहे. ( Women implement the Cotton to Fashion project ) एवढेच नव्हे तर अशा प्रकारचा संपूर्णतः महिलांनी महिलांसाठी चालविला असा हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 300 महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे.
आदिवासी महिला करतात सुत कताई -महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ( Maharashtra State Khadi and Village Industries Board ) अमरावती जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रम ( Solar Charkha Group Program ) हा नाविन्यपुर्ण पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील २१ गावामध्ये २५० महीलांना सोलर चरखे उपलब्ध करून देण्यात आले आहे. कस्तुरबा सोलर खादी महिला समितीमार्फत (Kasturba Solar Khadi Women's Committee )अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यापासून कापूस खरेदी करून त्यापासून कच्चा माल तयार करतात. विविध गावातील चरख्यावर सुत कताई करून त्यापासून सौर खादी कापड व विविध सौर खादी उत्पादनाची निर्मिती केली जाते. डाईंग, ब्लिचिंग, कॅलेंडरिंग, ब्लॉक प्रिंटिंग, यासह विविध प्रकारचे कपड्यावर प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी केली जाते.