अमरावती -अमरावती महानगरपालिकेत (Amravati Corporation) 9 मार्च 2022 पासून प्रशासकीय कारभाराला प्रारंभ झाला आहे. शहराची संपूर्ण धुरा आता प्रशासकांच्या हाती (Administrative work in Amravati Corporation) आली असताना शहरातील स्वच्छतेच्या कामासोबत विकासाची कामे सुरळीतपणे होत असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याससुद्धा प्रशासकांच्यावतीने जलदगतीने निर्णय घेतले जात आहेत.
विकासात्मक कामांचा दर्जा उंचावणे यावर भर - प्रशासक म्हणून कारभार हाती घेतल्यावर बरीच जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीचे भान राखून महानगरपालिकेचे जे दैनंदिन कर्तव्य, जबाबदारी आहेत ती चांगल्या प्रकारे निभावण्याकडे माझे लक्ष असल्याचे अमरावती महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले. विकासात्मक कामांचा दर्जा उंचवण्याकडेही आमचे लक्ष आहे. विकासात्मक कामे गतीने व्हावी याकडेसुद्धा आमचे लक्ष असून, महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारणे, शहरातील स्वच्छतेची कामे, आरोग्य व्यवस्था तसेच शिक्षण व्यवस्था सुधारावी, अशा कामांवर सध्या भर दिला जात आहे, असेही डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग - अमरावती महापालिकेत सध्या प्रशासकीय कारभार असला तरी पावसाळ्यात शहरात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच शहरातील 18 मोठे नाले आणि 22 लहान नाल्यांच्या सफाईच्या कामांना वेग आला आहे. 18 एप्रिल पासून शहरातील नाल्यांची सफाई जेसीबी आणि पोकलेन द्वारे सुरू झाली आहे, ज्या ठिकाणी नाल्यांवर मशीन लागू शकत नाही अशा ठिकाणी मनुष्यबळ लावून नाल्यांची सफाई सुरु झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला असून अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची रात्रपाळी ड्युटी लावण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे कोसळणारे बांधकाम इमारती यातून नागरिकांना सुरक्षित स्थळी पोचविण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी आतापासूनच सज्ज झाले आहेत. शहरातील अर्धवट पडलेल्या इमारती या अपघाताला निमंत्रण देणाऱ्या असून या इमारती पाडण्याची कारवाई येत्या काही दिवसात सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील एकूण 45 इमारती या कोसळण्याच्या अवस्थेत असून त्यात राहणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावून इमारत खाली करावी असे सूचित करण्यात आले आहे.