अमरावती -नेहमीप्रमाणे आपले औषधीचे दुकान बंद करून घरी ( Umesh Kolhe Murder ) दुचाकीने जाण्यासाठी निघालेले उमेश कोल्हे यांना दुकानापासून अवघ्या काही अंतरावर घंटी घड्याळ नजिक अचानक तिघा जणांनी अडविले. काही कळण्याच्या आतच त्यांच्या गळ्यावर चाकूने ( Umesh kolhe and accused yusuf khan relation ) वार झाला आणि ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. असे का होते आहे हे उमेश कोल्हे यांना कळले देखील नसावे. उमेश कोल्हे ( Umesh kolhe family reaction on murder ) हत्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली असताना या प्रकरणात आरोपी असणारा पशुवैद्यक युसुफ खान याच्या कुटुंबाला देखील या सर्व प्रकरणामुळे मोठा धक्का बसला आहे. या हत्या प्रकरणात उमेश कोल्हे आणि डॉ. युसुफ खान यांच्यात असणाऱ्या व्यावसायिक संबंधाची कडी तपास यंत्रणेचे लक्ष वेधत असतानाच ओळख आणि मैत्रीतून इतक्या टोकाची घटना घडू शकते या विचारानेच समाजमन सुन्न झाले आहे. 'ईटीव्ही भारत' ने या दोघांच्याही संबंधाबाबत तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्य बाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता दोघेही आपल्या कुटुंबासाठी मोठा आदर आणि आदर्श असल्याचे दिसून आले आहे.
युसुफ खानवर दोन जुळे मुलं आणि चार बहिणींची जबाबदारी -युसुफ खान याने अमरावती शहरातील रूरल इन्स्टिट्यूट येथून व्हेटर्नरी डॉक्टरचा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. यानंतर 2005 पासून त्याने प्रॅक्टिस सुरू केली. आपल्या परिसरातील जनावरांचा तज्ज्ञ डॉक्टर म्हणून त्याने नावलौकिक मिळविल्यावर शहरात ज्यांच्या घरी गाय, म्हैस आणि कुत्रे आहेत अशा सर्वांचाच तो परिचित होता. कामाप्रती तो अतिशय प्रामाणिक असल्याची माहिती त्याच्या संबंधितांनी दिली. कोणाचा कुठूनही कॉल आला तर तो प्राण्यांना उपचार देण्यासाठी धावपळ करायचा. त्याच्या कुटुंबात तो एकमेव शिक्षित व्यक्ती असून वडील गेल्यानंतर वृद्ध आई आणि चार लहान अविवाहित बहिणींची जबाबदारी त्याच्यावर आली. एका बहिणीचा घटस्फोट झाला असून ती सुद्धा त्याच्याच घरी राहते. कौटुंबिक जबाबदारीमुळे त्याचे लग्न उशिराने झाल्याचे त्याच्या संबंधितांनी सांगितले. 2016 मध्ये त्याचे लग्न एका सुशिक्षित कुटुंबातील मुलीसोबत झाले. तीन वर्षांपूर्वी त्याला दोन जुळे मुले झाले आहेत. घरातील जबाबदार व्यक्ती म्हणून धडपड करणारा डॉ. युसुफ खान हा त्याच्या कुटुंबीयांसाठी आदर्श असल्याचे देखील त्याच्या संबंधितांचे म्हणणे आहे.
उमेश कोल्हे कुटुंबीयांसाठी होते आदरणीय -उमेश कोल्हे हे जितके साधे तितकेच मनमिळाऊ व्यक्तिमत्व होते. कुटुंब वत्सल अशी त्यांची छबी होती. घरातील लहान भावांसाठी ते मित्रच होते. भावंडांसोबत 55 वर्षांच्या वयात देखील मस्ती करणे, होळीचा कार्यक्रम असो लग्न समारंभ असो नाचणे गाणे म्हणणे असा उत्साह त्यांच्यात होता. उमेश कोल्हे यांना दोन सख्खे भावंड असून चार चुलत भाऊ आणि तीन बहिणी असून हे सर्व अमरावती शहरातच राहतात. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आले की त्यांची संख्या जवळपास 45 ते 50 पर्यंत होते. कुटुंबातील या सर्वच व्यक्तींसाठी उमेश कोल्हे हे आदरणीय होते. वर्षभरापूर्वीच त्यांचे वडील वारल्यानंतर घरातील कुटुंबीयांसाठी ते वडीलधारी आणि कुटुंब प्रमुख होते.
उमेश कोल्हे आणि युसुफ खानचा असा झाला संपर्क -उमेश कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात दी. अमित मेडिकल नावाने प्राण्यांच्या औषधीचे दुकान आहे. त्यांच्या कुटुंबात कोणाचेही नाव अमित नाही. मात्र ज्यांच्याकडून हे दुकान खरेदी केले होते त्यावर अमित मेडिकल असाच उल्लेख असल्यामुळे त्यांनी तेच नाव कायम ठेवले होते. 2005-06 या काळात डॉ. युसुफ खान प्राण्यांसाठी लागणाऱ्या औषधींसाठी उमेश कोल्हे यांच्या दुकानात आला. हळूहळू युसुफ खान याच्या संपर्कात असणारे अनेक पशुवैद्यक देखील उमेश कोल्हे यांचे ग्राहक झाले. या व्यावसायिक संबंधातूनच उमेश कोल्हे आणि डॉ. युसुफ खान यांची मैत्री झाली. उमेश कोल्हे यांच्या घरातील प्रत्येक जण डॉक्टर युसुफ खान याला ओळखत होते, तर डॉक्टर युसुफ खानची पत्नी देखील कोल्हे कुटुंबीयांना ओळखायची, अशी माहिती दोन्ही कुटुंबीयांशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी दिली आहे.