अमरावती -कोरोनाने थैमान घातले असताना 22 फेब्रुवारीपासून अमरावतीत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आज लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. बाजारातील सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपरी 4 वाजेपर्यंत उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मागील दहा-बारा दिवसांपासून शांत असणाऱ्या अमरावती शहरात काहीशी गर्दी झाली आहे. कामानिमित्त अमरावतीकर घराबाहेर पडत आहेत. मात्र, तरी कोरोनाची भीती कायम आल्याचे जाणवत होते.
कोरोनाची तीव्रता कायम
काही राजकीय मंडळी आणि व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध केल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून शहर संपूर्ण खुले करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी अमरावती शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाची धास्ती कायम आहे. शहरातील शासकीय कोविड रुग्णालयासह सर्व खासगी रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. गृह विलगीकरणातही अनेक रुग्ण आहेत.
28 जानेवारीपासून वाढला कोरोना
गत वर्षी मार्च महिन्यात पहिल्यांदा अमरावतीत कोरोना रुग्ण आढळून आल्यावर पुढे सलग 6 महिने कोरोना रुग्ण शहरात वाढले होते. ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली असताना, या वर्षी 28 जानेवारीला एकाच दिवशी 78 कोरोना रुग्ण आढळून आलेत. त्यानंतर 29 जानेवारीला 93, 30 जानेवारीला 149, 31 जानेवारीला 128, 1 फेब्रुवारीला 92, 2 फेब्रुवारीला 118 रुग्ण, 6 फेब्रुवारीला 233, 11 फेब्रुवारीला 315, 16 फेब्रुवारीला 485, 17 फेब्रुवारीला 498, 18 फेब्रुवारीला 597, 18 फेब्रुवारीला 598, 20 फेब्रुवारीला 727 आणि 23 फेब्रुवारीला 926 रुग्ण आढळून आले. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे संकट उभे ठाकल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाला आळा घालण्यासाठी पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित केला.