अमरावती -आज महिला विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. याचा अर्थ ज्या महिला गृहिणी म्हणून संसाराची जबाबदारी पार पाडतात, त्यांचे कार्य कमी लेखण्या जोगे अजिबात नाही. या विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी हिमतीने पार पाडण्यासाठी कंबर कसणाऱ्या आणि पदर खोचणाऱ्या स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावतीत आयोजित स्त्री शक्ती सन्मान सोहळ्यात समाजातील विविध घटकातील कर्तुत्ववान स्त्रियांचा गौरव केला.
अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळा राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्यावतीने शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला खासदार सुप्रिया सुळे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, उपमहापौर कुसुम साहू, माजी लेडी गव्हर्नर कमल गवई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे आणि वसुधा देशमुख प्रामुख्याने उपस्थित होत्या. दरम्यान, या सोहळ्यात समाजसेविका श्री गौरी सावंत, नृत्यांगणा आणि अभिनेत्री सुधा चंद्रन, क्रीडापटू छाया भट, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, शेती उद्योजिका सुनिता निमसे, यांचा सत्कार करण्यात आला. हेही वाचा - नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे देशद्रोहीच - संभाजी भिडे
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्ता असो वा पैसा या चिरकाळ टिकत नसतात. आज अनेक महिला या विविध क्षेत्रात मोठी भरारी घेत आहेत. खरतर स्त्रीशक्ती पाठीशी असल्यानेच पुरुष मंडळी कर्तुत्व गाजवतात. त्याप्रमाणेच पुरुषांची साथ असल्यानेच आज महिला सुद्धा विविध क्षेत्रात सन्मानाचे स्थान पटकावित आहेत. स्त्री-पुरुष हे दोन्ही एकमेकांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहेत. ज्या महिला आम्ही गृहिणी आहोत असे म्हणून स्वतःला कमी लेखतात खरच त्यांचे कार्य फार मोठे आहे. आपल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला मदत करणे, आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करून त्यांचे भविष्य घडविणे, आपला संसार सांभाळणे ही काही साधी जबाबदारी नाही. त्यामुळे गृहिणींचे कार्य अतिशय मौल्यवान आहे. कुटुंबावर संकट आल्याने शेतकरी असणारा पुरुष आत्महत्या करतो. अशा घटना विदर्भात सर्वाधिक घडल्या आहेत. घरातील कर्ता पुरुष गेल्यावर महिलांनी खचून न जाता आपल्या कुटुंबाला सावरून जगण्याची नवी दिशा शोधण्याचे अनेक उदाहरणे आहेत. खरोखर अशा महिलांचे कर्तृत्व महान आहे. दरम्यान, या संबोधन वेळी सभागृहाचे वातावरण भावूक झाले होते.
हेही वाचा -नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिक कचरा द्या आणि पोटभर जेवण करा