अमरावती - मंगरूळ चव्हाळा येथे फासे पारधी मुलांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी मतीन भोसले यांनी 'प्रश्नचिन्ह' नावाची शाळा सुरू केली. २०१६ ला 'समृद्धी महामार्ग' शाळेजवळून जात असल्याने शाळेचा काही भाग तोडण्यात आला. तरिही फासे पारधी समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात राहावी, यासाठी मतीन भोसले यांनी पर्यायी व्यवस्था करून मुलांना शिकवणे सुरू ठेवले.
पर्यायी ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवणे सुरु असताना, शाळेलगत असलेला महावितरणचा विज पुरवणी संच (डीपी) समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांनी चोरला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे शाळेचे तत्काळ पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी शाळेतील विद्यार्थी व पालकांनी सोमवारी सकाळी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत, ठिय्या मांडला आहे.