महाराष्ट्र

maharashtra

MaharashtraBandh : अमरावतीत महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चा; बाजारपेठ बंद करण्याचे केले आवाहन

By

Published : Oct 11, 2021, 1:49 PM IST

महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले.

MaharashtraBandh
MaharashtraBandh

अमरावती -उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. शहरात मोर्चा निघताच सकाळी सुरू झालेली बाजारपेठ अकरा वाजता पुन्हा बंद करण्यात आली.

प्रतिक्रिया

राजकमल चौकातून निघाला मोर्चा -

सकाळी 10.33 वाजता अमरावती शहरातील राजकमल चौकातून महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख, जिल्ह्याचे माजी खासदार आणि शिवसेना नेते अनंत गुढे, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, जवाहरगेट , या परिसरात असणारी शहरातील मुख्य बाजारपेठ मोर्चाच्या माध्यमातून बंद करण्यात आली.

केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी-

शहरातील बाजारपेठ बंद केल्यावर मोर्चेकऱ्यांनी जयस्तंभ चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर हा मोर्चा पुन्हा राजकमल चौकात आला. राजकमल चौकात केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त -

मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहरात होता. जयस्तंभ परिसरातील काही दुकानासमोर असणाऱ्या वस्तू शिवसैनिकांनी फेकण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना आवर घातल्याने तणाव निवळला. ज्या मार्गाने मोर्चा निघाला त्या संपूर्ण मार्गावर पोलीस बंदोबस्त होता तसेच पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा मोर्चाच्या मागे होता.

हेही वाचा - LIVE UPDATE : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक, वाचा सर्व अपडेट एका क्लिकवर

ABOUT THE AUTHOR

...view details