अमरावती -सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या घनदाट जंगल असलेल्या मेळघाट हा भाग विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखला जातो. येथे असणाऱ्या चिखलदारासोबतच आता आमझरी हे साहसी पर्यटन स्थळ विकसित झाले आहे. चिखलदऱ्यापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आमझरी येथील थरारक खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी तसेच जंगल सफारी करण्यासाठी पर्यटक या नव्या पर्यटन स्थळाकडे आकर्षित होत आहेत. चिखलदरा, कोलकास, सेमाडोह यांसह आता मेळघाटात पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून आमझरीचीही सुखद भर पडली आहे.
आमझरी गावाचा झाला कायापालट -
चिखलदाऱ्यापासून 6 किलोमीटर अंतरावर आमझरी हे 700 लोकवस्तीचे टुमदार गाव जंगलात वसले आहे. उन्हाळ्यातही थंड असणाऱ्या या परिसरात विपुल प्रमाणात पाणी असल्याने गावाच्या चहुबाजूंनी आंब्याची घनदाट वृक्ष आहेत. 2015-16 पासून आमझरी परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास होत असतानाच या गावातील युवक-युवती व संपूर्ण ग्रामवासियांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत रोजगार उपलब्ध झाल्याने या गावाचा कायापालट व्हायला लागला आहे. आमझरी येथे साहसी पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने गावातील 20 युवक आणि युवतींना 2018मध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आले. शासन निर्णयाप्रमाणे सहासी पर्यटन सामग्रीमध्ये भर टाकून सुरक्षेसाठी त्यांचे सेफ्टी ऑडिट करण्यात आले. 20 युवक व युवती मिळून आता 'सातपुडा एडवेंचर आमझरी'या नावाने साहसी पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी सज्ज केले आहे. पर्यटनस्थळ म्हणून आमझरी विकसित झाल्यामुळे या गावातील युवकांना शाश्वत रोजगार उपलब्ध झाला असून या युवकांना मिळालेल्या रकमेच्या 75 टक्के रक्कम तरुणांना प्राप्त होत असून 25 टक्के रक्कम ही वनव्यवस्थापन समितीमध्ये जमा होते. वन व्यवस्थापन समितीकडे जमा होणाऱ्या रकमेचा उपयोग गावाच्या विकासासाठी तसेच सहासी खेळ सामग्रीच्या डागडुजीसाठी केला जात असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी पियुशा जगताप यांनी' ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. आमझरी येथील युवकांनी सुद्धा आमझरीचा पर्यटन दृष्टीने विकास होत असल्यामुळे याचा लाभ आमच्या गावाला होत असल्याचेही त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
या सहासी खेळांचा समावेश -
आमझरी येथे सातपुडा एडवेंचर ग्रुप मार्फत झिप लाईन, बंजी इंजेक्शन, विविध क्रॉसिंग आदिंसह साहसी खेळ येथे उपलब्ध आहेत. विदर्भात बंजी इंजेक्शन हा सहासी प्रकार पहिल्यांदाच आमझरी येथे सुरू झाला असून अतिशय धाडसाने पर्यटक बंजी इंजेक्शनची मजा घेत आहेत. यासह या पर्यटन संकुलामध्ये बॅटरीवर असणाऱ्या सायकल चालविण्याचा आनंदही पर्यटक घेत आहेत. हा संपूर्ण परिसर इकोफ्रेंडली असून या परिसरात कुठेही प्लास्टिक टाकण्यास बंदी आहे.