अमरावती - अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे ते कुऱ्हा रोड हा अनेक वर्षापासून अतिशय खराब झाला आहे. हा रस्ता जिवघेणा ठरत आहे. त्यामुळे आता आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे. गुढीपाडव्यापर्यंत कामाला सुरूवात न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गुढीपाडव्याला बेशरमच्या पानाफुलांनी सजविणार असल्याचा इशारा आप नेते नितीन गवळी यांनी दिला आहे. याप्रकरणी उपविभागीय अभियंता यांना निवेदन देखील दिले आहे.
चांदूर रेल्वे ते कुऱ्हा रस्त्याची अवस्था दयनीय-
चांदूर रेल्वे ते कुऱ्हा रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. मात्र बांधकाम विभागाकडून अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊले उचललेले दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चांदूर रेल्वे शहरातील रस्ते चांगले असतांना सुद्धा वेगवेगळे नाव देऊन पुन्हा - पुन्हा रस्ते खराब म्हणून तर रस्ते मजबूत करण्याच्या नावावर गरज नसतांना नवीन रस्ते तयार करण्यात आले. परंतु चांदूर रेल्वे ते कुऱ्हा या रस्त्यावर अनेक अपघात सुद्धा झाले आहे.