अमरावती -आई, वडिलांचा विरोध झुगारुन सहा महिन्यापूर्वी एका तरुण-तरुणीने नोंदणी विवाह केला होता. मात्र, गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी मध्यस्ती करुन बुधवारी ( 27 जुलै ) साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडणार होता. पण, तेव्हाच मुलीकडील मंडळींनी मुलाकडील मंडळींना लग्न समारंभात मारहाण केली. तसेच, मुलीला घेऊन गेले. अंजनगाव तालुक्यातील सातेगाव येथे हा फिल्म स्टाईल धुमधडाका घडला. मात्र, मोठ्या नाट्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा शेवट गोड ( brawl between two groups during the wedding ceremony in amravati ) झाला.
असे आहे संपूर्ण प्रकरण - मलकापुर येथील एका घरी मिस्री काम करणाऱ्या तरुणाचे 19 वर्षीय मुलीसोबत सुत जुळलं. जानेवारी महिन्यात त्यांनी 'साथ जियेंगे साथ मरेंगे'च्या आणा भाका खात नोंदणी पध्दतीने विवाह केला. परंतू, सहा महिन्यानंतर त्यांनी घरातून पळून जाऊन सोबत राहण्याचा निर्णय घेत २२ जुलैला सुरत येथे नातेवाईकांच्या घरी रहायला गेले. याबाबतचे वृत्त वाऱ्यासारखे दोन्ही गावात पसरले. दोन्ही गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी दोघांच्याही आई-वडिलांची समजूत काढून विवाह लावून देण्याचे ठरवलं. त्याप्रमाणे २७ जुलैला सातेगाव येथे १०० लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. मात्र, मनात असलेली खदखद मुलीकडील मंडळींना आवरली नाही. क्षुल्लक कारणावरुन त्यांनी नवरदेवासह पाहुणे मंडळींना मारहाण करणे सुरु केले. त्यातच नवरी मुलीला तिच्या नातेवाईकांनी गाडीत घालून लग्नमंडपातून पसार झाले. ही घटना रहीमापुर पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ मुलीला परत आणण्याच्या हालचाली सुरु केल्या. तोपर्यंत रहीमापुर पोलीस ठाण्यात दोन्हीकडील नागरिक तक्रार देण्यास गेले.