अमरावती -राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात जवळपास 800 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा सनसनाटी आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. यासंदर्भात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रारही केली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तर याला प्रत्यूत्तर देताना खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे ज्यांनी मागासवर्गीयांचा अधिकार मारला, असा ज्यांच्यावर आरोप आहे, आदिवासींच्या जमीनी लाटल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, त्यांना आदिवासींबाबत आताच का प्रेम उफाळून आले आहे, असा सवाल महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
मेळघाटात तीन महिन्यात 49 बालमृत्यू -
महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुंना शासनातर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार व अन्य महत्त्वाचे घटक मिळाले नसल्याने गत तीन महिन्यात मेळघाटात 49 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात असे दुर्दैवी वास्तव आल्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी स्मृती इराणी यांना दिलेल्या पत्रात खेद व्यक्त केला आहे.
ब्लॅक लिस्टेड कंपनीला कंत्राट -
उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केलेल्या व महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी व व्यंकटेश या कपन्यांना पळवाट शोधून उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून कंझुमर फेडरेशनच्या माध्यमातून पुरवठा करण्याचे काम दिले गेले आहे. कंझुमर फेडरेशनमार्फत देण्यात आलेल्या या पुरवठा कंत्राटात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून पालकमंत्री यशोमती ठाकूर या प्रथमदर्शनी दोषी असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या लक्षात आणून दिले. या योजनेत केंद्र शासन आणि राज्य शासन यांचा प्रत्येकी 50% रकमेचा निधी समाविष्ट असतो आणि एकप्रकारे ही केंद्र शासनाची फसवणूक असून यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जातीने लक्ष घालावे व या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरपणे कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.