अमरावती - जिल्ह्यात एप्रिल 2021 ते मार्च 2022 या एक वर्षाच्या काळात एकूण 33 बाल विवाह टळले आहेत. जिल्हा बाल संरक्षण समितीच्या पुढाकारामुळे या अनुचित प्रकारांवर आळा घालण्यात यश आले. काही प्रकरणांमध्ये पालकांची समजूत घालण्यात आली तर काही ठिकाणी थेट पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. अक्षय तृतीयेच्या पर्वावर मोठ्या प्रमाणात बालविवाह लावले जाण्याची भीती आहे. त्यामुळे बाल हक्क संरक्षण समितीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी हाय अलर्ट घोषित केला आहे.
33 पैकी सात प्रकरणात पोलीस तक्रार -अमरावती जिल्ह्यात वर्षभरात 33 ठिकाणी बालविवाह होत असल्याच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे तक्रारी प्राप्त झाल्यात. विशेष म्हणजे या 33 ठिकाणी ही समितीने पोचून बाल विवाह रोखण्याचे प्रयत्न केले. यापैकी सात ठिकाणी जिल्हा बाल संरक्षण समितीला प्रखर विरोधाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत पोलिसांची मदत घेऊन लहान मुलांचे लग्न लावून देणाऱ्या कुटुंबियांविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली. 26 ठिकाणी मात्र पालकांची समजूत काढून त्यांच्याकडून लहान मुलांचे लग्न आम्ही लावून देणार नाही असेच सहमती पत्र घेण्यात आल्याची माहिती जिल्हा बाल कल्याण अधिकारी अजय डबले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
मेळघाटात बाळगली जात आहे सतर्कता -जिल्ह्यातील मेळघाट हा आदिवासीबहुल भाग असून या ठिकाणी बाल विवाह होण्याची संख्या अधिक आहे. वर्षभरात या भागात नेमके किती बालविवाह झाले याची माहिती महिला व बालविकास विभागाकडे उपलब्ध नाही. असे असले तरी मेळघाटात चाईल्ड लाईन स्पेशल टास्क नेमण्यात आले आहे. यामध्ये ग्रामसेवकाला बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकेकडे सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. गावात बाल विवाह होत असले तर ते रोखण्याची आणि याबाबत जिल्हास्तरावर त्वरित माहिती देऊन बाल विवाह कसा रोखता येईल यासाठी त्वरित पावले उचलण्याची जबाबदारी प्रत्यक्ष गावात असणाऱ्या ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका केकडे सोपविण्यात आली आहे.
अक्षय तृतीयेच्या पर्वावर प्रशासन सज्ज -अक्षय तृतीयेला सर्वसामान्यपणे अनेक विवाह होतात. यामध्ये बाल विवाह होण्याची शक्यतासुद्धा अधिक असल्यामुळे महिला व बाल विकास विभागाची जिल्हास्तरीय यंत्रणा हाच सज्ज झाली आहे. एकूणच राज्यभरात गत वर्षभरात एकूण 1338 बालविवाह रोखण्यात राज्यातील सर्व जिल्हास्तरीय बाल हक्क संरक्षण समिती ला यश आले आहे. अक्षय तृतीयेच्या पर्वावर संपूर्ण राज्यात बालविवाह रोखण्यासाठी सज्ज राहण्याचा इशारा बाल हक्क संरक्षण समितीला देण्यात आला असून अमरावती जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी शिक्षणाधिकारी गटविकास अधिकारी पोलिस निरीक्षक तसेच बालहक्क संरक्षण समिती सदस्य पोलिस पाटील अंगणवाडी सेविका बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी ग्रामसेवक यांना दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अक्षय तृतीया ला शहरातील सर्व मंगल कार्यालयांना अलर्ट केले आहे.
बालविवाह रोखण्यासाठी शासन कटिबद्ध - राज्यातील आदिवासी भागात गेल्या तीन वर्षात सुमारे १५ हजार बालविवाह झाल्याची माहिती, राज्य सरकारने न्यायालयाला सादर केली आहे. कुपोषण आणि बालमृत्यू हे या मागचे कारण असल्याचे सरकारने नमूद केले. ही आकडेवारी चकित करणारी असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त करत कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान यासंदर्भात मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी ईटीव्ही भारतने संपर्क साधला असता, अशा घटना घडू नयेत यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. शासन आणि प्रशासन बालविवाह रोखण्यासाठी सतत प्रयत्नरत आहे. त्याचवेळी नागरिकांनीही असे काही होत असेल तर त्याची कल्पना संबधितांना देणे गरजेचे आहे. त्यामुळे असे बालविवाह वेळीच रोण्यात मदत होईल.