अमरावती- शासकीय कोविड रुग्णालयात आता खाटा अपुऱ्या पडायला लागल्या आहेत. खासगी रुग्णालयात ऑक्सिजन, इंजेक्शनसाठी दुप्पट दर मोजावे लागतात अशी परिस्थिती आहे. कोरोनाने अमरावती जिल्ह्यात हाहाकार उडाला असताना, मागील 22 दिवसात 111 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असून, स्मशानभूमीत कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांग लावायला लागत आहे अशी भयावह परिस्थिती आहे.
अमरावतीत कोरोनाचा पहिला रुग्ण 3 एप्रिलला आढळून आला होता. विशेष म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले होते. आता 5 महिन्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात 22 सप्टेंबरपर्यंत एकूण 11 हजार 185 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 2 हजार 436 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 922 जण होम क्वारंटाइन आहेत. एप्रिल ते जुलैपर्यंत दिवसाला साधारण 15 ते 25 पर्यंत कोरोना रुग्ण आढळत असताना ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग प्रचंड झपाट्याने वाढला आहे. आता सप्टेंबर महिन्यात दिवसाला 350 ते 400 पर्यंत कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदरही प्रचंड वाढला असून, दिवसाला 8 ते 15 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू होत आहेत.
हेही वाचा -ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन
बडनेरा मार्गावर महापालिकेच्या तपासणी केंद्रावर सद्या रोज 100 च्या वर तपासणी केली जात असून, शहरातील सर्वच चाचणी केंद्रांवर अशीच गर्दी असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र गुल्हाने यांनी दिली.
सामान्य माणसाचा आता देवच वाली: डॉ. सुनील देशमुख
कोरोनाची परिस्थिती सध्या भयावह आहे. आज राज्यकर्त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भिती माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली. कोरोना चाचणी, खाटांची कमतरता, रुग्णवाहिका मालकांकडून केलेली दरवाढ असा सावळा गोंधळ सुरू झाला आहे. आज सामान्य माणसाला कोरोना झाला तर त्याचा देवाच वाली आहे, असे डॉ. सुनील देशमुख म्हणाले. ही गंभीर परिस्थिती आटोक्यात आणण्याची जबाबदारी जनप्रतिनिधी, राज्यकर्ते आणि प्रशासनाची आहे. खरं तर तीन महिन्याचा लॉकडाऊन हा येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्यास तयारी करण्यासाठी होता. मात्र, इथे प्रशासनाने काही एक तयारी केली नाही.
आज मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या शहरात 300 ते 400 खाटांचे नवे कोविड ररुग्णालय सज्ज झालेत. आपल्याकडे कुठलीही तयारी अद्यापही दिसत नाही. ऑक्सिजन प्लांट उभारण्याची सूचना मी तीन महिन्यांपूर्वी केली पण काहीच झालेलं नाही. राज्यकर्त्यांनी बैठका घ्यायच्या, अधिकाऱ्यांनी माना दोलवायच्या ही गोष्ट बरोबर नाही. सामान्य जनतेला असं वेठीस धरू शकत नाही ही शासनाची, प्रशासनाची जबाबदारी आहे. अधिकारी जर सक्षम नसतील त्यांनी आपली बदली इतरत्र करून घ्यावी असा रोष व्यक्त करीत राज्यकर्ते, प्रशासन यांनी इच्छाशक्ती असेल तर परिस्थिती आटोक्यात येऊ शकते, अशी आशाही डॉ. सुनील देशमुख यांनी व्यक्त केली.