मुंबई: जागतिक बाजारातील आज झालेल्या घसरणीमुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारात भारतातील प्रमुख शेअर निर्देशांक घसरले आहेत. आज सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 397.67 अंकांनी घसरून 60,921.84 अंकांवर आला. तर NSE निफ्टी 108.4 अंकांनी घसरून 17,927.45 वर आला आहे. याआधी गुरुवारी सेन्सेक्स ४४.४२ अंकांच्या किंवा ०.०७ टक्क्यांच्या किंचित वाढीसह ६१,३१९.५१ वर बंद झाला होता. तर निफ्टी 20 अंकांनी किंवा 0.11 टक्क्यांनी वाढून 18,035.85 वर बंद झाला होता.
फायद्यातील आणि तोट्यातील शेअर्स: नेस्ले, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या कंपन्यांच्या शेअर्सचे आज सेन्सेक्समध्ये मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, एशियन पेंट्स आणि रिलायन्स या कंपन्यांचे शेअर्स मात्र वधारले आहेत. जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि चीन इतर आशियाई बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने शेअर बाजार गडगडले आहेत. गुरुवारी अमेरिकी बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.78 टक्क्यांनी घसरून 84.48 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया आठ पैशांनी घसरला: अमेरिकन चलनातील मजबूती आणि देशांतर्गत शेअर बाजारात मंदीमुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया आठ पैशांनी घसरला आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 82.77 वर कमजोर झाल्याचे दिसून आले. नंतरच्या व्यापारात, तो 82.78 च्या पातळीवर घसरला, जो त्याच्या मागील बंद किंमतीपेक्षा आठ पैसे कमी आहे.