मुंबई:सरकारने महागाई कमी करण्यासाठी आठवड्याच्या शेवटी अनेक वित्तीय उपाययोजना जाहीर केल्या मात्र बाजारात अस्थिर सत्र (Volatile session in the market) पाहायला मिळाले. सेन्सेक्सने दिवसाची सुरुवात सकारात्मक 54,459.95 अंकांवर केली. सकाळपासूनच बाजारात अस्थिरता दिसून आली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 54,191.55 अंकांच्या नीचांकी पातळीवर घसरला. तथापि, इंट्रा-डे मध्ये त्याने 54,931.30 अंकांच्या उच्चांकापर्यंत मजबूत मजल घेतली. व्यापार सत्राच्या अखेरीस बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला आणि दिवसाचा शेवट घसरलेल्या अवस्थेत झाला.
बेंचमार्क सेन्सेक्स मागील व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी 1534.16 अंकांनी म्हणजे 2.91 टक्क्यांनी वधारला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 50 हा मागील सत्राच्या बंदच्या तुलनेत 51.45 अंकांनी म्हणजे 0.32 टक्क्यांनी घसरून 16,214.70 अंकांवर बंद झाला होता. शुक्रवारी निफ्टी 456.75 अंकांनी म्हणजे 2.89 टक्क्यांनी वधारला होता. महागाईचा दबाव कमी करण्यासाठी सरकारने आठवड्याच्या शेवटी अनेक उपाययोजना जाहीर केले मात्र बाजारात चढ उताराचे अस्थिर व्यवहार पहायला मिळाले.
शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. शुल्क कपातीमुळे या इंधनाच्या किरकोळ किमतीत लक्षणीय घट झाली आहे. पेट्रोलचे किरकोळ दर प्रतिलिटर ९.५ रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. या निर्णयामुळे महागाई कमी होण्यास मदत होणार आहे.
महागाईचा दबाव कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर ऑटो, एफएमसीजी आणि भांडवली वस्तूंच्या समभागात तेजी आली.महिंद्रा अँड महिंद्रा 4.14 टक्क्यांनी वाढून 942.05 रुपये झाला. मारुती सुझुकी 4.07 टक्क्यांनी वाढून 7896.20 रुपयांवर पोहोचला. हिंदुस्थान युनिलिव्हर 2.35 टक्क्यांनी वाढून 2380.05 रुपयांवर पोहोचला. L&T 2.21 टक्क्यांनी वाढून 1645.65 रुपयांवर पोहोचला.