नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) आणि सिंगापूरच्या 'पे नाऊ'चे एकत्रीकरण सुरू केले आहे. या प्रसंगी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि सिंगापूरचे चलन प्राधिकरणाचे एमडी रवी मेनन यांनी दोन्ही देशांमधील UPI-PayNow लिंकेज प्रक्रियेला सुरुवात केली. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, UPI-PayNow लिंकेज भारत आणि सिंगापूर दरम्यान दोन्ही देशांतील नागरिकांसाठी एक मोठी भेट आहे, ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'मी भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांतील लोकांचे अभिनंदन करतो.'
युपीआयसाठी अनेक देशासोबत करार:UPI आणि Paynow कनेक्टिव्हिटी मंगळवारी पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरमध्ये राहणाऱ्या लाखो भारतीयांना या सुविधेचा फायदा होणार आहे. UPI सेवा सुरू करण्यासाठी सिंगापूर हे नवीन नाव असू शकते, परंतु या पेमेंट सिस्टमसाठी अनेक देशांसोबत करार आधीच केले गेले आहेत. UPI आणि PayNow कनेक्टिव्हिटी दोन्ही देशांमधील व्यापारात खूप फायदेशीर ठरणार आहे.
डिजिटल पेमेंटमध्ये भारत आघाडीवर: जगाचा विचार केला असता भारत जगभरात डिजिटल पेमेंटमध्ये आघाडीवर आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताच्या या प्रणालीचे कौतुक केले आहे. त्याच वेळी, देशात UPI द्वारे पेमेंटचे आकडे सतत वाढत आहेत. भारत सरकार त्याचा विस्तार करण्यावर सातत्याने भर देत आहे. कोरोना काळापासून या डिजिटल पेयमेन्टसचा वापर भारतात वाढला आहे.