हैदराबाद Paytm Shares Fell 20 Percent : पेटीएमचे शेअर्स गडगडल्यानं गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गुंतवणूकदारांनी पेटीएममध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र पेटीएमनं सुरक्षित नसलेल्या 50 हजारापेक्षा कमी लोनवर मर्यादा आणल्यानंतर पेटीएमचे शेअर्स गडगडल्याची सध्या चर्चा सुरू आहे. पेटीएमचे शेअर्स तब्बल 20 टक्क्यानं गडगडले आहेत. त्यामुळे पेटीएमच्या गुंतवणुकदारांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे.
पेटीएमच्या शेअरमध्ये निचांकी घसरण :आज शेअर बाजार सुरु होताच पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या फिनटेक फर्म वन 97 कम्युनिकेशन लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. आज सकाळी पेटीएमचे शेअर 20 टक्क्यांनी घसरुन 645.45 रुपयांच्या निच्चांकी पातळीवर गेला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली. आज सकाळी शेअर बाजारात काही मिनिटांतच सेन्सेक्स 300 पेक्षा अधिक अंकांनी घसरल्यानं बाजारात मोठी गडबड झाली. निफ्टीही 70 अंकानं घसरला. सकाळी पेटीएमचे शेअर 9.15 वाजता 728.85 रुपयांवर सुरू झाला होता. मात्र त्यानंतर 20 मिनिटांच्या ट्रेडिंगमध्ये 650.65 रुपयांच्या निचांकी पातळीवर आला.