नवी दिल्ली LPG Price Hike : ३० नोव्हेंबरला राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांमधील निवडणुका आटोपल्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी देशातील तेल कंपन्यांनी मोठा धक्का दिला आहे. १ डिसेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत २१ रुपयांनी वाढवली आहे. मात्र सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
आजपासून नवे दर लागू : देशातील तेल कंपन्यांच्या वेबसाइटनुसार, एलपीजी सिलेंडरच्या नवीन किमती अपडेट करण्यात आल्या आहेत. यानुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवी किंमत १७९६.५० रुपये झाली आहे. यापूर्वी ते १७५५.५० रुपयांना उपलब्ध होतं. त्याचवेळी आर्थिक राजधानी मुंबई मध्येही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नव्या किमतीत वाढ झाली आहे. येथील नवीन दर १७४९ रुपये आहे, जो पूर्वी १७२८ रुपये होता. त्याच वेळी, कोलकातामध्ये नवीन दर १९०८ रुपये आहेत. पूर्वी हा दर १८८५.५० रुपये होता. तर, चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवीन किंमत १९६८.५० रुपये झाली आहे. आधी येथे सिलेंडर १९४२ रुपयांना उपलब्ध होतं.