चेन्नई : Israel Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. हे युद्ध पश्चिम आशियामध्ये पसरल्यास कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला धोका निर्माण होऊ शकतो. यावर देशभरातील अर्थतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर प्रभाव पडेल : अॅक्यूटी रेटिंग्ज आणि रिसर्चचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधन प्रमुख सुमन चौधरी म्हणाले की, 'जर हा संघर्ष पश्चिम आशियामध्ये पसरला आणि इतर देश यात सामील झाले, तर वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात आणखी आव्हानं निर्माण होऊ शकतात. विशेष म्हणजे, ओपेक प्लस (ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज आणि इतर तेल उत्पादक देश) द्वारे पुरवठ्यात कपात केल्यामुळे तेलाच्या जागतिक किमती आधीच वाढल्या आहेत.
जागतिक बाजारपेठेला मंदीचा सामना करावा लागेल : चौधरी म्हणाले की, राजकीय संघर्ष वाढल्यास जागतिक बाजारपेठेला आणखी मंदीचा सामना करावा लागू शकतो. याचा विपरीत परिणाम रुपयावर होईल. ते पुढे म्हणाले की, 'भारतावर या संघर्षाचा थेट परिणाम मर्यादित असेल. कारण इस्रायलचा भारतासोबतचा व्यापार १० बिलियन डॉलर्सपेक्षा थोडाच जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये इस्रायलसोबत भारताची निर्यात ८.५ अब्ज डॉलर्स आणि आयात २.३ अब्ज डॉलर्स इतकी होती.