नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलन 24 टक्क्यांनी वाढून 15.67 लाख कोटी रुपये झाले असल्याचे अर्थ मंत्रालयाने शनिवारी सांगितले. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने शनिवारी म्हटले की, 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंत त्यांचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 12.98 लाख कोटी रुपये आहे. जे एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीपेक्षा 18.40 टक्के अधिक आहे.
आयकर संकलन २९ टक्क्यांनी वाढले:अर्थमंत्रालयाने जारी केलेले हे कर संकलनाचे आकडे 10 फेब्रुवारी 2023 पर्यंतचे आहेत. एप्रिल 2022 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कॉर्पोरेट आयकराचा वाढीचा दर 19.33 टक्के असल्याचेही मंत्रालयाने सांगितले. तर एकूण वैयक्तिक आयकर संकलन 29.63 टक्क्यांनी वाढले आहे. हा आकडा कर परताव्याच्या समायोजनानंतरचा असल्याचेही मंत्रालयाने सांगितले आहे.
सरकारला 15.67 लाख कोटी रुपये मिळाले: चालू आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कर संकलनाशी संबंधित सुधारित अंदाजपत्रकाच्या अंदाजे 79 टक्के रक्कम आतापर्यंत जमा झाली आहे. सुधारित अंदाज सुमारे 16.50 लाख कोटी रुपये ठेवण्यात आला आहे, जो 14.20 लाख कोटी रुपयांच्या बजेट अंदाजापेक्षा जास्त आहे. CBDT च्या विधानानुसार, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण 15.67 लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले आहे. जे एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीपेक्षा 24.09 टक्के अधिक आहे.