नवी दिल्ली :फॉक्सकॉन कंपनी गुजरातमध्ये वेदांता कंपनीसोबत चिप बनवण्याचे उत्पादन करण्यात गुंतवणूक करणार होती. मात्र कंपनीला कोणीही भागिदार न मिळाल्याने फॉक्सकॉन कंपनीने आपला गाशा गुंडाळण्याचे ठरवले आहे. याबाबत फॉक्सकॉन कंपनीने आपण वेदांता कंपनीसोबतची भागिदारी संपुष्टात आणत असल्याचे स्पष्ट केले. या प्रकल्पावरून महाराष्ट्रात मोठा वादंग निर्माण झाला होता. हा प्रकल्प पुण्यातून गुजरातमध्ये का नेला, आता तरी सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
फॉक्सकॉन कंपनी गुजरातमध्ये चिप बनवण्याचे उत्पादन आता करणार नसल्याचे स्पष्ट झाले. फॉक्सकॉन कंपनी गुजरातमध्ये 19.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार होती. फॉक्सकॉन ही तैवानची इलेक्ट्रॉनिक्स निर्माता कंपनी मोबाइल फोनपासून रेफ्रिजरेटर आणि कारपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरल्या जाणार्या चिप्स बनवण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. हा प्रकल्प अगोदर महाराष्ट्रात येणार होता, मात्र त्यानंतर फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला पळवण्यात आला होता. याबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन टीका केली आहे. फॉक्सकॉन प्रकल्पा प्रकल्पाला शेवटच्या क्षणी सगळ्यात व्यवहार्य पर्याय होता. मात्र, हा प्रकल्प महाराष्ट्रातून हलवल्याचा मोठा परिणाम झाला आहे. भारताला आणि भारतातील तरूण बेरोजगारांना जागतिक स्तरावरच्या आर्थिक प्रगतीपासून वंचित रहावं लागले. सत्ताधीशांच्या महत्वाकांक्षी क्रूर राजकारणामुळे आणि भेदभावामुळ हे घडले असल्याचे सांगत ठाकरे यांनी मोदी सरकारवर आरोप केला आहे.
गुजरातमध्ये होणार होता प्रकल्प : तैवानची कंपनी असलेली फॉक्सकॉन ही सेमिकंडक्टर चिप बनवण्यासाठी सुप्रसिद्ध असलेली कंपनी आहे. फॉक्सकॉनने वेदांता कंपनीसोबत गुजरातमध्ये सेमीकंडक्टर उत्पादन उभारण्यासाठी करार केला होता. या प्रकल्पावर फॉक्सकॉन कंपनी तब्बल सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती. मात्र फॉक्सकॉनने हा करार संपुष्टात आणल्याने ही गुंतवणूक आता होणार नाही. मात्र सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पासाठी वेदांता पूर्णपणे वचनबद्ध आहे. भारतातील पहिला अर्धसंवाहक प्रकल्प उभारण्यासाठी वेदांता कंपनी काही भागीदारांच्या संपर्कात असल्याची माहिती अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या वेदांताने दिली आहे. मात्र त्यांनी आपल्या नवीन भागीदारांची कोणतीही माहिती दिली नाही.