नवी दिल्ली : एकीकडे आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला आणि टॅक्स स्लॅबमध्ये 7 लाख रुपयांपर्यंत करात सूट देण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे अर्थसंकल्पादरम्यान शेअर बाजारात मोठी तेजी आल्याचे दिसून आले. अर्थसंकल्पाच्या बातम्यांदरम्यान, जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत फेरबदलाची चर्चाही दिवसभर जोरात होती. मुकेश अंबानींनी गौतम अदानींना श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत मागे टाकले आहे.
अदानी दहाव्या क्रमांकावर : गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांची एकूण संपत्ती ८३.९ अब्ज डॉलरवर आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मुकेश अंबानी यांनी आता गौतम अदानी यांना 84.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मागे टाकले आहे. फोर्ब्सच्या यादीत अदानी दहाव्या क्रमांकावर पोहोचले आहे. तर अंबानी 9व्या स्थानावर आहेत. त्याच वेळी, यापूर्वी, अदानी यांना गेल्या 24 तासांत 10 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. त्यादरम्यान अदानी चौथ्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर घसरले.
२० अब्ज डॉलरचे नुकसान : एका दिवसात 20.8 अब्ज डॉलर्सच्या घसरणीनंतर अदानी एलोन मस्क, जेफ बेझोस आणि मार्क झुकरबर्ग यांच्या पंक्तीत सामील झाले आहेत. इलॉन मस्क यांना एका दिवसात 35 अब्ज डॉलर, मार्क झुकरबर्ग यांना 31 अब्ज डॉलर आणि जेफ बेझोस यांना 20.5 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. यासोबतच २४ तासांत सर्वाधिक नुकसान झालेल्या अब्जाधीशांच्या यादीत अदानी सामील झाले आहे.