नवी दिल्ली:सहारा सहकारी संस्थांच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सहारा रिफंड पोर्टल लॉन्च केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सहाराच्या गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळू शकणार आहे. पोर्टल लॉन्च करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, सरकारने गुंतणवूकदारांचा पैसा परत करण्यासाठी एक पाऊल टाकले आहे. अमित शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्यांचे पैसे अनेक वर्षांपासून सहारा सहकारी संस्थांमध्ये अडकले आहेत, त्यांच्यासाठी आज खास दिवस आहे.
काय म्हणाले गृहमंत्री : देशभरातील लाखो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये सहारा इंडियामध्ये अडकले आहेत. दरम्यान भारत सरकारने हे पोर्टल लॉन्च केल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आशा निर्माण झाली आहे. आपला पैसा परत मिळेल, असा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाच्या वचनबद्धतेमुळे त्या सर्व लोकांना दिलासा मिळेल जे त्यांच्या कष्टाचे पैसे परत मिळण्याची वाट पाहत आहेत. - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
4 कोटी लोकांना होणार फायदा : पोर्टल उद्घाटनाच्या कार्यक्रमात अमित शाह म्हणाले की, सहारा रिफंड पोर्टलच्या माध्यमातून सुरुवातीला 4 कोटी लोकांना फायदा होणार आहे. या पोर्टलद्वारे गुंतवणूकदारांना 5 हजार कोटी रुपये परत मिळतील. लाखो गुंतवणूकदारांनी सहारा इंडियामध्ये पैसे गुंतवले होते. परंतु मुदतपूर्ती पूर्ण होऊनही म्हणजेच मॅच्युरिटी होऊनही गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळत नाहीत अशा गुंतवणूकदारांनी सहारा इंडियाच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. या तक्रारी केंद्र सरकारसह अन्य स्तरांवर करण्यात आल्या होत्या. पैसे परत मिळावेत यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी आंदोलनेदेखील केली होती. यानंतर केंद्र सरकारने गुंतवणूकदारांचा पैसा परत करण्याचा निर्णय घेतला आणि एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केला.
पैसे परत करण्याची प्रक्रिया: सहारा इंडियामध्ये पैसे गुंतवलेले गुंतवणूकदारांची मॅच्युरिटी झाली आहे. त्यांना सहारा रिफंड पोर्टलद्वारे पैसे परत केले जातील. यासाठी गुंतवणूकदारांना प्रथम पोर्टलवर त्यांची नावे नोंदवावी लागतील. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू होईल. यानंतर सहारा समूहाच्या संस्था 30 दिवसांत कागदपत्रांची पडताळणी करतील. ऑनलाइन क्लेम केल्यानंतर 15 दिवसांच्या आत एसएमएस पाठवून गुंतवणूकदारांना कळवले जाईल. यानंतर गुंतवणुकीची रक्कम बँक खात्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे 45 दिवस लागू शकतात.
काय आहे प्रकरण : सहारा इंडिया आणि सेबी यांच्यात पैशांबाबत बराच काळ वाद सुरू आहे. 2009 मध्ये जेव्हा सहारा हाउसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन या सहाराच्या दोन कंपन्यांनी त्यांचा IPO आणण्याची ऑफर दिली होती, तेव्हा IPO येताच सहारातील गडबडीचा बाब जगासमोर आली. सहारा समूहाने चुकीच्या आणि मनमानी पद्धतीने 24 हजार कोटींची रक्कम जमा केल्याचेही सेबीच्या निदर्शनास आले. त्यानंतर सेबीने त्याची सविस्तर चौकशी केल्यानंतर आर्थिक अनियमिततेची बाब समोर आली. त्यानंतर सेबीने सहारा समूहाला गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह परत करण्यास सांगितले होते. सहारा रिफंड पोर्टलमुळे लाखो गुंतवणूकदारांना समस्यांना दिलासा मिळणार आहे.