नवी दिल्ली– अॅमेझॉनकडून ऑनलाईन औषध विक्रीच्या व्यवसायाला केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनेसह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचाने विरोध केला आहे. अॅमेझॉनने बंगळुरूमध्ये प्रायोगिक तत्वावर अॅमेझॉन फार्मसी सुरू करण्याची गेल्या आठवड्यात घोषणा केली.
अॅमेझॉन फार्मसीला केमिस्ट आणि ड्रगिस्टची राष्ट्रीय संघटनेने (एआयओसीडी) विरोध केला आहे. या संघटनेचे देशात साडेआठ लाखांहून अधिक सदस्य आहेत. सरकारने त्वरित हस्तक्षेप करून बेकायदेशीर ऑनलाईन फार्मसीचा उद्योग थांबवावा, अशी संघटनेने मागणी केली आहे. या संघटनेच्या मागणीप्रमाणे स्वदेशी जागरण मंचने सरकारकडे मागण्या केल्या आहेत.
स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय समन्वयक अश्वनी महाजन यांनी ट्विट करून भूमिका स्पष्ट केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की आम्ही विदेशी निधी असलेल्या ई-फार्मसी हे बेकायदेशीर असल्याचे खूप दिवसांपासून सांगत आहेत. त्यामध्ये अॅमेझॉन बळजबरीने येण्याचा प्रयत्न करत आहे. उच्च न्यायालयाचे आदेश असूनही सरकार नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरले आहे.
अॅमेझॉन फार्मसीमधून आयुर्वेदिक औषधे, डॉक्टरांच्या चिठ्ठीप्रमाणे दिलेली औषधे व ऑक्सिमीटरसारखी आरोग्य साधने विकण्यात येत आहेत. एआयओसीडीने कंपनीचे सीईओ जेफ बेझोस आणि देशातील व्यवस्थापक व वरिष्ठ उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांना पत्र पाठवून ई-फार्मसीच्या व्यवसायाला विरोध केला आहे. दरम्यान, याबाबत कंपनीने प्रतिक्रिया दिली नाही.
ऑनलाईन औषध विक्री हा सतत वादग्रस्त विषय ठरला आहे. गेल्या काही वर्षांत ऑनलाईन औषध विक्रीबाबत न्यायालयात प्रकरणे गेली आहेत. तसेच कायदेशीर मुद्देही उपस्थित झाले आहेत. यापूर्वी काही कंपन्यांनी ऑनलाईन औषधे विकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सरकारी नियम स्पष्ट नसल्याने ऑनलाईन औषधे विकणाऱ्या कंपन्यांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे.