नवी दिल्ली :हिंडेनबर्ग रिसर्चने जानेवारी महिन्यात जारी केलेल्या अहवालानंतर अदानी समुह चांगलाचआर्थिक अडचणीत सापडला आहे. या अहवालानंतर समुहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. आता अदानी समूहाने त्यांच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करण्यास सुरुवात केली आहे. समुहाने रविवारी सांगितले की, त्यांनी 31 मार्चच्या मुदतीपूर्वी घेतलेल्या 2.65 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड केली आहे. एका निवेदनात अदानी समूहाने म्हटले आहे की, त्यांनी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांमधील शेअर्स गहाण ठेवून घेतलेल्या 2.15 बिलियन डॉलर्स कर्जाची परतफेड केली आहे. तसेच त्यांनी अंबुजा सिमेंट्सच्या अधिग्रहणासाठी घेतलेले 500 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देखील फेडले आहे.
मुदतीच्या आत परतफेड : अदानी समूहाने कर्जाची परतफेड करण्यासाठी निधीचा स्रोत उघड केला नसला तरी, प्रवर्तकांनी चार सूचीबद्ध कंपन्यांमधील अल्पसंख्याक भागभांडवल यूएस-आधारित जीक्युजी भागीदारांना 15,446 कोटी रुपयांना विकल्याच्या काही दिवसांतच हे समोर आले आहे. अदानीने 31 मार्च 2023 च्या वचनबद्ध मुदतीपूर्वी 2.15 बिलियन डॉलर्सच्या मार्जिन लिंक्ड इक्विटी बॅक्ड फायनान्सिंगचे प्रीपेमेंट पूर्ण केले आहे. या व्यतिरिक्त अंबुजा अधिग्रहणासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी घेतलेल्या 500 दशलक्ष डॉलर्सची परतफेड देखील केली आहे. प्रवर्तकांनी आता 6.6 बिलियन डॉलर्सच्या एकूण संपादन किंमतीपैकी अंबुजा आणि एसीसी मध्ये 2.6 अब्ज डॉलर्स गुंतवले आहेत.