नवी दिल्ली:अदानी समूहाचे शेअर्स शुक्रवारीही बाजारात घसरत राहिले आणि सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये 20 टक्क्यांनी घसरले. अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर अनेक आरोप केले आहेत. आपल्या अहवालात, उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील गटावर शेअर्समध्ये फिरवाफिरवी आणि अकाउंटिंगमध्ये फसवणूक केल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने केला आहे. कंपनीच्या या आरोपानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली आहे.
अदानी समूहाचे समभाग: अदानी टोटल गॅसमध्ये 19.65 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 19 टक्के, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 15.50 टक्के आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये 6.19 टक्क्यांनी शेअर्स घसरले. दुसरीकडे, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे शेअर्स 5.31 टक्के, अदानी विल्मर 5 टक्के आणि अदानी पॉवर 4.99 टक्क्यांनी घसरले आहेत. चार्टवरून समजून घेऊयात अदानी समूहाच्या कोणत्या कंपनीचे शेअर्स किती घसरले आहेत?
अदानी कंपनीचे नाव | शेअर्समध्ये घसरण (टक्क्यांमध्ये) |
अदानी टोटल गॅस कंपनी | 19.65 |
अदानी ट्रांसमिशन | 19 |
अदानी ग्रीन एनर्जी | 15.50 |
अदानी एंटरप्रायजेज | 6.19 |
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन | 5.31 |
अदानी विल्मर | 5 |
अदानी पॉवर | 4.99 |
अदानी समूह करणार हिंडेनबर्गवर कारवाई:अदानी समूहाच्या समभागांच्या किमती घसरत असताना, कंपनीने हिंडेनबर्ग रिसर्चविरुद्ध 'दंडात्मक कारवाई' करणार असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी कंपनी कायदेशीर पर्याय शोधत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हिंडनबर्ग रिसर्च शेअर विक्रीला हानी पोहोचवण्याच्या प्रयत्नात 'अविवेकीपणे' काम करत आहे. त्याच वेळी, अमेरिकन आर्थिक संशोधन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने आम्ही आमच्या अहवालावर ठाम असल्याचे सांगितले.