नवी दिल्ली: अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसला डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी एंटरप्रायझेस ७ फेब्रुवारी २०२३ पासून या निर्देशांकात व्यापार करणार नाही. त्यामुळे अदानी समूहाला अमेरिकन शेअर बाजारातून झटका बसला आहे. अमेरिकन शेअर बाजाराने आपल्या निर्देशांकात या बदलाची माहिती दिली आहे. याच परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची शक्यता आहे.
फसवणुकीच्या आरोपांमुळे घेतला निर्णय:S&P डाऊ जोन्सने म्हटले आहे की, ते 7 फेब्रुवारीपासून अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसला त्यांच्या क्रेडिबिलिटी निर्देशांकातून काढून टाकत आहेत. S&P Dow Jones ने सांगितले की, हे पाऊल अकाउंटिंग फसवणुकीच्या आरोपांमुळे मीडिया आणि स्टेकहोल्डरच्या विश्लेषणानंतर उचलण्यात आले आहे. या इंडेक्समधून बाहेर काढणायत आल्याने अदानी समूहापुढील अडचणी वाढल्या आहेत.
अदानी समूह कशामुळे आलाय अडचणीत?: हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी 2023 रोजी एका अहवालात दावा केला होता की, अदानी समूह अनेक दशकांपासून शेअर्स मॅनिपुलेशन आणि अकाउंट फ्रॉड करत आहे. मात्र, अदानी समूहाने हा अहवाल खोटा असल्याचे सांगत संपूर्ण अहवालाला आपल्या वतीने ४१३ पानांचे उत्तर दिले. अदानी यांनी तर याला खोटेपणाचे बंडल म्हटले आणि त्यांच्या कंपनीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे सांगितले. अदानी समुहाने हिंडेनबर्ग रिसर्चच्या 88 प्रश्नांची 413 पानांत उत्तरे दिली असून, आपली बदनामी करण्यासाठी हे सर्व जाणूनबुजून केले जात असल्याचे म्हटले आहे.