मुंबई- येस बँकेच्या शेअरची किंमत ६० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. येस बँकेच्या पतमानांकनात मूडीजने सुधारणा केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी येस बँकेला आणखी भांडवली सहाय्य करणार असल्याचे सोमवारी आश्वासन दिले. त्याचा परिणाम म्हणून येस बँकेच्या शेअरमध्ये तेजी आली आहे.
येस बँकेच्या प्रति शेअरची किंमत शेअर बाजारात सकाळी अकरा वाजता ६० रुपये ६५ पैसे होती. तर मागील सत्रात शेअर बाजार बंद होताना येस बँकेच्या शेअरची किंमत २३ रुपये ५५ पैसे होती. मूडीज या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने येस बँकेचा पतदर्जा हा 'सकारात्मक' केला आहे.
हेही वाचा-'आधार-पॅन' जोडणीची अंतिम मुदत चुकवू नका- प्राप्तिकर विभाग
येस बँकेच्या ठेवीदारांनी खात्यांमधून पैसे काढण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी केले. तसेच येस बँकेला गरज भासली तर आणखी भांडवली सहाय्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठेवीदारांनी चिंता करण्याची गरज नाही, त्यांचा पैसा बँकेत सुरक्षित असल्याची ग्वाहीदेखील दास यांनी दिली.
हेही वाचा-कोरोनाच्या प्रभावातून सावरला शेअर बाजार; निर्देशांकांची ५०० अंशांनी उसळी
आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेवरील तात्पुरते निर्बंध १८ मार्चपासून काढण्यात येणार आहेत. येस बँकेत खासगी सात बँकांनी भांडवली गुंतवणूक केली आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाने येस बँकेचा ४९ टक्के हिस्सा घेतला आहे. यासाठी स्टेट बँकेने येस बँकेचे ६ हजार ५० कोटी रुपयांचे ६०५ कोटी शेअर खरेदी केले आहेत.