नवी दिल्ली- खाजगी वाहतूक कंपनी उबेर आता आवश्यक वस्तूंची घरपोच सेवा उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी उबेरने बिगबास्केट बरोबर भागीदारी केली आहे. देशात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उबेरने हा निर्णय घेतल्याचे समजले आहे.
फक्त बिगबास्केटच नव्हे तर, अत्यावश्यक वस्तू व ओषधी पुरवणाऱ्या देशातील इतर कंपन्यांशी देखील आम्ही घरपोच सेवेबाबत चर्चा करत आहोत. आमच्या दुचाकी, चारचाकी आणि वाहनचालकांच्या मोठ्या जाळामुळे आम्हाला देशातील नागरिकांना अत्यावश्यक वस्तू सुरक्षितरित्या त्यांच्या घरी पोहोचवता येईल, असे उबेरकडून सांगण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वेळेवर अत्यावश्यक सुविधा मिळतील आणि वाहनचालकांना देखील पैसे कमवण्याची संधी मिळेल. त्यासाठी आम्ही कुठलेही कमिशन घेणार नाही, असे भारतातील आणि दक्षिण आशियातील उबेरचे संचालक प्रभजित सिंह यांनी सांगितले.